रायगड : आळंदी येथून सहलीसाठी दिवेआगरला गेलेल्या ४२ विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १ ऑक्टोबर रोजी घडली. मृत विद्यार्थ्यांमध्ये ११वी आणि १२वीतील विद्यार्थ्यांचा समावेश असून, या घटनेमुळे आळंदीसह पुणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
आळंदी येथील खासगी पोलीस प्रशिक्षण अकॅडमीशी संबंधित विद्यार्थ्यांची ही सहल होती. या सहलीत २५ विद्यार्थी आणि १७ विद्यार्थिनी असे एकूण ४२ जण सहभागी झाले होते. दिवेआगर समुद्रकिनारी विद्यार्थी फिरत असताना काही जण समुद्राच्या पाण्यात उतरले. यावेळी एका विद्यार्थ्याला पाण्यात अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. त्याला वाचवण्यासाठी इतर विद्यार्थी पुढे गेल्यानंतर एकूण आठ विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस, महसूल विभागाचे कर्मचारी आणि शिक्षकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. समुद्रातून आठही विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी सीपीआर देण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, वैद्यकीय प्रयत्नांनंतरही आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
मृत विद्यार्थ्यांची नावे यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर, तन्मय दत्तात्रय वाहिले, कौस्तुभ संदीप दौंड, कैवल्य वासनकर, राजवीर वहिले, प्रणव बनसोडे आणि सुमित अहिरे अशी आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
या दुर्घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी समुद्रकिनारी लाइफगार्ड, पर्यटकांना योग्य मार्गदर्शन आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त केली आहे. दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कशी घडली आणि त्यावेळी समुद्रकिनारी कोणती सुरक्षा व्यवस्था उपलब्ध होती, याबाबतचा तपास सुरू आहे. अधिकृत तपासानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.