🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांडगेवाडीच्या बालकास मुंबईत मिळाले जीवनदान- फोर्टिस हॉस्पिटलमध्ये यशस्वी हृदयप्रत्यारोपण - टाटा ट्रस्ट, आरबीएसके, लोकप्रतिनिधी, लोकसहभागातून आर्थिक बळ

सांडगेवाडीच्या बालकास मुंबईत मिळाले जीवनदान
- फोर्टिस हॉस्पिटलमध्ये यशस्वी हृदयप्रत्यारोपण 
- टाटा ट्रस्ट, आरबीएसके, लोकप्रतिनिधी, लोकसहभागातून आर्थिक बळ
- “सेवा संकल्प अभियान” कालावधीमध्ये शस्त्रक्रिया पूर्ण


सांगली : संपूर्ण सांगली जिल्ह्यातील पहिली हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबई येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पडली असून, रूग्णाची प्रकृती स्थिर आहे. सांडगेवाडी येथील १५ वर्षीय अथर्व सागर चव्हाण या बालकास यामुळे नवजीवन मिळाले असून, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाबरोबर टाटा ट्रस्ट, लोकप्रतिनिधी, लोकसहभागातून उपचारांना आर्थिक बळ मिळाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील अंगणवाडी व शालेय लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. तपासणीमधून संदर्भित किरकोळ तसेच गंभीर रूग्णांना उपचार अथवा आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया या उपलब्ध योजनांमधून मोफत पूर्ण करण्यात येतात. या कार्यक्रमांतर्गत पलूस पथकांतर्गत शालेय तपासणीमधील अॅकॅडेमिक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुंडल येथील १५ वर्षीय अथर्व सागर चव्हाण या बालकांस एआरव्हीसी हा गंभीर हृदयरोग असल्याचे निदर्शनास आले. औषधोपचार अथवा शस्त्रक्रिया कामी येणार नव्हत्या तर आवश्यकता होती ती थेट नवीन हृदयाची.

आजाराची माहिती अथर्वच्या पालकांना मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अत्यंत हालाखीची परिस्थिती, कमावणारे एकटेच अथर्वचे वडील आणि ते देखील खाजगी ठिकाणी वाहनचालक म्हणून काम करतात. तुटपुंजे उत्पन्न व या आजाराकरिता लागणारी अंदाजित ३० लक्ष इतकी अत्यंत मोठी रक्कम जमा करणे अशक्य असल्याने पालक हतबल झाले. सहा वर्षांपूर्वी मोठा मुलगा दुर्धर आजारानेच कालवश झाल्याचे दुःखाचे व्रण अजून ताजेच होते. त्यातच अथर्वलाही दुर्धर आजाराचे निदान झाले. अशी परिस्थिती हाताळण्यास असमर्थ असलेल्या पालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत पथकांतील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सरनाईक, डॉ. शुभांगी पाटील यांनी दिलासा देवून खर्चाची काही रक्कम ही शासनामार्फत उभारली जावू शकते असे सांगून धीर दिला. उपचाराकरिता लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. 
परिस्थितीचे व आजाराचे गांभीर्य लक्षात घेवून डॉ. दीपक सरनाईक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीमध्ये ही बाब निदर्शनास आणून दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रूग्णालय पलूस डॉ. संजय पाटील या सर्वांच्या उपस्थितीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांमधून लाभार्थीस जास्तीत जास्त अनुदान उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला व अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक असणारा इतर अतिरीक्त निधी उभारण्यास देखील रूग्णांस मार्गदर्शन व सहाय्य करण्याचे निश्चित झाले. 

याच दरम्यान फोर्टिस हॉस्पिटल, मुंबईचे डॉ. धनंजय मालनकर यांच्याकडे हृदय प्रत्यारोपणासाठी अथर्वचे नाव नोंदविण्यात आले. संपूर्ण भारतातून फोर्टिस हॉस्पिटलकडे नाव नोंदणी होत असते. यात अथर्वचे नाव चौथ्या क्रमांकास होते. रक्तगट, इतर आवश्यक तपासण्या, वय इत्यादी बाबींची जुळवणूक झाल्यावरच हृदय प्रत्यारोपण शक्य होते. संयोगाने केवळ महिन्याभरातच फोर्टिस हॉस्पिटलकडून रक्तगटासह सर्व गोष्टी जुळणारा मेंदूमृत झालेल्या व अवयवदानास इच्छुक असणाऱ्या रुग्णाचे हृदयदान करण्यास पालक इच्छुक असल्याचा दूरध्वनी फोर्टिस रूग्णालयाकडून अथर्वच्या पालकांना आला. 

दि. २६ सप्टेंबर रोजी अथर्वच्या पालकांनी अथर्वला फोर्टिस हॉस्पिटल येथे दाखल केले. दरम्यान आवश्यक रकमेपैकी टाटा ट्रस्ट, मुंबई यांचेकडून सर्व बाबींची पडताळणी करून रूग्णालयांस वीस लाखाची आर्थिक मदत मंजूर झाली. अथर्वच्या वडिलांच्या व सुरवातीपासूनच अथर्वसाठी धडपड करणारे सांडगेवाडीचे सरपंच अमर वडार यांच्या प्रयत्नातून आ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष व आरोग्य सभापती ऋषीकेश लाड, जालिंदर कातकडे, सर्जेराव नलवडे तसेच अथर्वच्या शाळेतील सर्व शिक्षक व आजी व माजी विद्यार्थी तसेच भागातील गणेश मंडळे, विविध संस्था, दानशूर खाजगी रक्कमदाते इत्यादींच्या मार्फत उर्वरित खर्चाची रक्कम उभारण्यास मदत झाली.

रविवार दि. २७ सप्टेंबर रोजी ०८ तासांची प्रदीर्घ हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया डॉ. धनंजय मालनकर व पथकाने फोर्टिस हॉस्पिटल येथे अथक प्रयत्नाने यशस्वीरित्या पूर्ण केली. डॉ. स्वाती गरेकर यांनी शस्त्रक्रियेस सहाय्य केले. तसेच, ज्योती कराडकर यांनी मेंदूमृत रूग्णाच्या अवयवदान प्रक्रियेकरिता पालकांचे समुपदेशन केले व फोर्टिस रूग्णालयामार्फत टाटा ट्रस्ट, मुंबई यांचेकडून निधी उभारण्याकरिता सहकार्य केले. अशा रीतीने “सेवा संकल्प अभियान” कालावधीमध्ये शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

अथर्वला नवीन हृदय मिळाले असून आज रोजी त्याच्या प्रकृतीमध्ये प्रगतशील सुधारणा होत आहे. हृदयप्रत्यारोपणाची जिल्ह्यातील ही पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया ठरली आहे. जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच अथर्वची मदत केलेल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने आज अथर्व नवीन हृदयासह जीवनदान मिळाले आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अनुदान व भविष्यातील त्याच्या मोफत औषधोपचारासंबंधीचे कामकाज जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी व कार्यक्रम सहाय्यक अनिता हसबनीस हे पहात आहेत.
जिल्ह्यातील अशाच प्रकारच्या इतर हृदयरूग्ण संशयित बालकांकरिता जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. ०९ ऑक्टोबर रोजी सिव्हिल हॉस्पिटल, सांगली येथे मोफत इको तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.