मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, एसआयआर प्रक्रियेवरून दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्द्यांवरून काँग्रेससह इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे नेते गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी, यांच्यासह विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भेट घेण्याची विनंती केली होती. मात्र, मुख्य न्यायमूर्तींनी ही भेट नाकारली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी नेत्यांनी सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी मुख्य न्यायमूर्तींची भेट घेऊन आपली भूमिका मांडण्याची इच्छा व्यक्त केली होती. मतदारयाद्यांमधील कथित गैरप्रकार, एसआयआर प्रक्रिया आणि आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत त्यांना निवेदन द्यायचे होते. मात्र, मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ई-मेलद्वारे पाठवलेल्या उत्तरात भेट नाकारण्यामागील कारणे सांगितली आहेत.
राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळाला प्रशासकीय पातळीवर भेटता येणार नाही
न्यायालयाचे काम याचिका दाखल झाल्यानंतर त्या प्रकरणाची सुनावणी घेणे आणि त्यावर निर्णय देणे, हे आहे. राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळाशी स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा करणे, ही न्यायालयाची कार्यपद्धती नाही, अशी भूमिका मुख्य न्यायमूर्तींनी मांडल्याचे माध्यमांनी म्हटलं.
सुप्रीम कोर्टाचे दरवाजे प्रत्येक नागरिकासाठी खुले आहेत. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यासाठी न्यायालय कटिबद्ध आहे, असेही उत्तरात नमूद करण्यात आले आहे. काँग्रेसने या प्रकरणी याचिका दाखल केल्यास, प्रलंबित प्रकरणांसह मंगळवारी सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयाने दर्शवली आहे.
राहुल गांधींचे सुप्रीम कोर्टापर्यंत मोर्चाचे आवाहन
मुख्य न्यायमूर्तींनी भेट नाकारल्याचे वृत्त समोर आले असले, तरी राहुल गांधी यांनी सोमवारी सुप्रीम कोर्टापर्यंत मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. युवक, विरोधी पक्ष, नागरी संस्था आणि लोकशाही व संविधानावर विश्वास असलेल्या नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. या मोर्चात काँग्रेससह समाजवादी पक्ष, शिवसेना आणि इंडिया आघाडीतील अन्य पक्षांचे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही घेतली होती भेट
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि अन्य विरोधी नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबतची चिंता व्यक्त केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.