🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"गोकुळ निवडणुकीत महायुतीला धक्का; 'अतिआत्मविश्वासामुळे पराभव', प्रकाश आबिटकरांचे स्वपरीक्षण"

"गोकुळ निवडणुकीत महायुतीला धक्का; 'अतिआत्मविश्वासामुळे पराभव', प्रकाश आबिटकरांचे स्वपरीक्षण" 


गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने विजय मिळवत महायुतीला धक्का दिला. या निकालानंतर महायुतीच्या पराभवाची कारणे समोर येऊ लागली असून, राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. "महायुतीमध्ये थोडासा आत्मविश्वास, किंबहुना अति आत्मविश्वास नडला," अशी कबुली आबिटकर यांनी दिली.

गोकुळच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच नेते एकत्र आले होते. दुसरीकडे, सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने ही लढत एकतर्फी केल्याचे चित्र दिसले. महायुतीकडूनही विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त केला जात होता. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनीही निवडणुकीपूर्वी विजयाचा विश्वास बोलून दाखवला होता. मात्र, प्रत्यक्ष निकालात महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही.

महायुतीच्या पराभवामागे समन्वयाचा अभाव होता का, असा प्रश्न प्रकाश आबिटकर यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, "समन्वय निश्चित होता. योग्य पद्धतीने काम सुरू होते. परंतु, ज्या पद्धतीने मतदारांनी कौल दिला, त्यामुळे आमचा अति आत्मविश्वास नडला, असे म्हणायला पाहिजे." गोकुळच्या निवडणुकीत महायुतीचे नेते एकत्र असूनही पराभवाला सामोरे जावे लागल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. 




या निकालाचे विश्लेषण करून नेमक्या त्रुटी शोधण्याची गरज असल्याचे आबिटकर यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले. "आता याबद्दल आम्ही सगळे बसू आणि निश्चितपणे विचारमंथन करू," असेही आबिटकर यांनी सांगितले. त्यामुळे गोकुळच्या निकालानंतर महायुतीमध्ये पराभवाची कारणे शोधण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटील यांच्या आघाडीने बाजी मारल्यानंतर महायुतीच्या पहिल्या प्रतिक्रियेतून अति आत्मविश्वासाचा मुद्दा समोर आला आहे. आता या पराभवातून महायुती कोणता धडा घेणार आणि आगामी राजकीय रणनीतीत काय बदल करणार, याकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.