भीमाशंकर अभयारण्याच्या सीमेलगत असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात प्रस्तावित ३ हजार मेगावाटच्या जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या हजारो वृक्षांच्या कत्तली विरोधात ज्येष्ठ अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
"शंभर-दीडशे वर्षे जुनी झाडे तोडून आणि मुक्या पशू-पक्ष्यांच्या घरांवर बॉम्ब टाकून आपण नेमके काय साध्य करत आहोत? निसर्ग आणि पर्यावरण उद्ध्वस्त करण्यासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे का?"
असा संतप्त सवाल करत सयाजी शिंदे यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सरकार आणि प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला. गुजरातच्या 'टॉरेंट पॉवर' कंपनीकडून कर्जत-भीमाशंकर पट्ट्यात पम्प्ड स्टोरेज ऊर्जा प्रकल्प उभारला जात असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड सुरू असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे.
"झाडे तोडणारे कोरोनापेक्षा भयंकर रोग; ताटं-वाट्या वाजवून त्यांना हाकलून लावा!"
या प्रकल्पासाठी यापुढे कर्जत किंवा भीमाशंकर परिसरात एकही झाड तोडू दिले जाणार नाही, असा ठाम निर्धार सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. गावकऱ्यांना थेट आवाहन करताना ते म्हणाले, "विकासाच्या नावाखाली आपल्या जमिनी आणि जंगले गेली, तर पुढच्या पिढ्या भिकेला लागतील. त्यामुळे यापुढे गावात कुणी झाडे तोडायला आले, तर तो कोरोनापेक्षाही भयंकर रोग आला आहे असे समजा आणि घराबाहेर पडून हातात ताटं-वाट्या वाजवत त्यांना तिथून हाकलून लावा! एकही झाड न तोडता कंपनीला प्रकल्प करायचा असेल तर आमचा विरोध नाही; पण झाडावर कुऱ्हाड चालवू देणार नाही."
"भीमाशंकर आणि कर्जतची सीमा मुक्या 'शेकरू'ला कशी समजणार?"
भीमाशंकरच्या जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधताना सयाजी शिंदे यांनी अत्यंत भावनिक मुद्दा उपस्थित केला. "सह्याद्री हे जगातील एक मोठे आश्चर्य आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेला 'शेकरू' भीमाशंकरच्या जंगलात राहतो. पण आपण फक्त भीमाशंकरच्या हद्दीतच राहायचे आणि शेजारच्या कर्जतच्या जंगलात जायचे नाही, ही माणसाने कागदावर आखलेली सीमा त्या मुक्या प्राण्याला कशी समजणार? जगात आधीच फक्त १८ टक्के जंगल शिल्लक राहिले आहे, ते ३३ टक्क्यांवर नेण्याऐवजी आहे तीच समृद्ध जंगले आपण संपवत आहोत," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सह्याद्रीच्या रक्षणासाठी उभारणार १ लाख तरुणांची फौज
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये होणारी ही लुटमार रोखण्यासाठी आता 'सेव्ह सह्याद्री' (Save Sahyadri) ही स्वतंत्र संघटना उभारली जात असल्याची घोषणा सयाजी शिंदे यांनी केली. या चळवळीत राज्यभरातील १ लाख तरुण-तरुणींना जोडले जात असून, सह्याद्रीचा ऱ्हास करणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाविरोधात ही फौज कायदेशीर आणि प्रत्यक्ष लढा देणार आहे.
दरम्यान, राज्यात नाशिक, शक्तिपीठ महामार्ग, पालघर एमआयडीसी (५ लाख झाडे) आणि शिरोडा (७० हजार झाडे) अशा विविध प्रकल्पांच्या नावाखाली सरकारी आकडेवारीनुसार तब्बल १० लाख झाडे तोडण्याचा घाट घातला जात असून, प्रत्यक्षात हा आकडा तिप्पट असण्याची भीती पत्रकार परिषदेत उपस्थित पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.