आखाती युद्धामुळे जगातील परिस्थिती गंभीर बनली असून, तेलाच्या उपलब्धतेवरही परिणाम होत असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी एपस्टीन फाईल प्रकरणावरही भाष्य करत केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी , उद्योगपती अनिल अंबानी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत अनेक दावे केले.
चव्हाण म्हणाले की, आखाती युद्धामुळे परिस्थितीमुळे अमेरिकेलाही तेलासाठी रशियाकडे वळावं लागलं. भारतातून डिझेल मिळू शकेल का, हे पाहण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जामनगर रिफायनरीला भेट देऊन गेले, असा दावाही त्यांनी केला.
हरदीपसिंह पुरींच्या राज्यसभा संधीवरून दावा
इलॉन मस्क यांनी ‘भारताचे पंतप्रधान मुकेश अंबानी’ असल्याचा उपरोधिक उल्लेख केल्याच्या चर्चेचाही चव्हाण यांनी संदर्भ दिला. या विधानाबाबत स्पष्टीकरण मिळायला हवं, असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांचा खासदारकीचा राजीनामा घेतल्याचा दावा करत चव्हाण यांनी त्यांना पुन्हा राज्यसभेची संधी न मिळण्यामागे एपस्टीन फाईलमधील कथित छायाचित्रं कारणीभूत असू शकतात, असं म्हटलं.
ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची शक्यता?
एपस्टीन फाईलमध्ये आणखी काय दडलं आहे, हे सांगता येत नाही, असं चव्हाण म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला. ट्रम्प यांचे हजारो फोटो समोर आल्याचं सांगत, संबंधित नावं उघड होऊ नयेत यासाठी प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला.याच कारणामुळे आगामी अमेरिकेतील निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव होऊ शकतो आणि त्यांना महाभियोगालाही सामोरं जावं लागू शकतं, असं भाकीतही चव्हाण यांनी केलं. ट्रम्प यांची सत्ता गेल्यानंतर एपस्टीन फाईलमधील अधिक माहिती समोर येऊ शकते, असंही ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.