सांगलीत मांजरांमध्ये भयानक 'फॅलिन पॅनलिकोपेनिया' विषाणूचा धुमाकूळ! ही ५ लक्षणे दिसल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका!
सांगली : शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत मांजरांचा वेगाने मृत्यू होत असल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या (cat parvovirus symptoms and treatment) आहेत. मांजरांत अत्यंत वेगाने पसरणाऱ्या 'फॅलिन पॅनलिकोपेनिया' (एफपीव्ही) म्हणजेच 'कॅट पार्वाव्हायरस' या प्राणघातक आजारामुळे सांगलीत मोठ्या प्रमाणावर मांजरी दगावल्या आहेत.
हा विषाणूजन्य आजार अतिशय संसर्गजन्य असून, योग्य वेळी उपचार न मिळाल्यास अवघ्या दोन ते तीन दिवसांत मांजराचा मृत्यू होत आहे. या संकटामुळे सांगलीतील मांजरप्रेमीत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
या लक्षणांकडून दुर्लक्ष नको!
पांढरी किंवा पिवळसर फेसासारखी उलटी होणे आणि मांजर अचानक खाणे-पिणे पूर्णपणे बंद करते हे प्रमुख लक्षण आहे. मांजर अतिशय वेगाने अशक्त होत जाते, तिचे वजन घटते आणि शरीर खालावते. मांजराला पिवळसर जुलाब होतात. शरीराचे तापमान अचानक खूप वाढणे किंवा आजार बळावल्यास शरीर एकदम थंड पडते. मांजर अत्यंत थकल्यासारखी किंवा आजारी असल्यासारखी घराच्या एका कोपऱ्यात किंवा अंधारात लपून राहते.
'एफपीव्ही लस' हाच एकमेव बचाव
श्री. नाईक म्हणाले, 'या जीवघेण्या आजारापासून मांजरांना सुरक्षित ठेवण्यासाठी लस देणे अनिवार्य आहे. मांजराचे पिल्लू ६ ते ८ आठवड्यांचे झाल्यावर पहिली लस दिली जाते. त्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दर ३ ते ४ आठवड्यांच्या अंतराने आणखी डोस दिले जातात. पिल्लांचे सुरुवातीचे डोस पूर्ण झाल्यावर दरवर्षी एक बूस्टर डोस देणे आवश्यक असते.'
संसर्ग कसा पसरतोय?
पशुवैद्यकांच्या मते, हा विषाणू हवेपेक्षा बाधित मांजरीच्या संपर्कातून वेगाने पसरतो. ॲनिमल राहतचे किरण नाईक म्हणाले, 'आजारी मांजराची विष्ठा, लघवी किंवा उलटी यातून हा व्हायरस बाहेर पडतो. बाधित मांजराची खाण्याची भांडी, गादी, खेळणी तसेच माणसाचे हात आणि कपड्यांवर हा विषाणू काही काळ जिवंत असतो. त्यामुळे एका मांजराकडून दुसऱ्या मांजराला याचा संसर्ग होतो. हा आजार अत्यंत वेगाने शरीरावर ताबा मिळवतो. यावर घरी उपचार करणे शक्य नाही. लक्षणे दिसताच सांगलीतील जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात किंवा डॉक्टरांकडे धाव घ्या.'
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.