🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सिग्नल तोडला, पोलिसाशी हुज्जत अन् थेट रस्त्यावरच ठिय्या; छत्रपती संभाजीनगरमध्ये कारचालकाचा हायव्होल्टेज ड्रामा!

सिग्नल तोडला, पोलिसाशी हुज्जत अन् थेट रस्त्यावरच ठिय्या; छत्रपती संभाजीनगरमध्ये कारचालकाचा हायव्होल्टेज ड्रामा!

छत्रपती संभाजीनगर : सिग्नल तोडून येणाऱ्या एका बेभान झालेल्या कारचालकाने कारवाईचा बडगा उगारणाऱ्या वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत थेट रस्त्यावर झोपून हायव्होल्टेज ड्रामा केला. सेव्हनहिल पुलाखाली ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० ते ८ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांना धक्काबुक्की करत शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करणाऱ्या या कारचालकाविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर वाहतूक शाखा-१ चे अंमलदार राजू प्रभू सुरासे (वय ५२, रा. हर्सूल) हे महिला पोलिस अंमलदार निशा खरतडे यांच्यासोबत सेव्हनहिल परिसरात ड्रंक अँड ड्राईव्ह व वाहतूक नियमन करत होते. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास काळ्या काचा असलेली एक चारचाकी गाडी (एमएच-२०-जीक्यू-६१३५) सिग्नल तोडून भरधाव वेगाने आली. पोलिसांनी गाडी बाजूला घेण्याचा इशारा करताच चालकाने गाडी थांबवून ‘पूर्वीही तुम्ही हर्सूल येथे मला फाईन मारला होता,’ असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार बाजूला न घेता त्याने मोठमोठ्याने आरडाओरड करत वाहतूक अडवली.

‘मी गाडीखाली पोरं-बाळं झोपवतो,’ म्हणत ड्रामा गाडीची काळी फिल्म का काढली नाही, असा सवाल करत पोलिस ई-चलन फाडण्यासाठी पुढे गेले असता, कारचालक अचानक आक्रमक झाला. 'मी गाडी रस्त्यात आडवी लावून टाकेन, माझी लहान लेकरं आणि सर्वांना गाडीखाली झोपवतो,' असे ओरडत तो स्वतः धावत्या वाहनांसमोर रस्त्यावर झोपू लागला. यामुळे चौकात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत अन्य वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

सरकारी कामात अडथळा; गुन्हा दाखल परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने नियंत्रण कक्षाला माहिती देत अधिकची कुमक मागवली. ही बाब लक्षात येताच, कारचालकाने 'गाडी बाजूला घेतो' असे सांगत अंमलदार सुरासे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व तिथून गाडीसह पळ काढला. चालकाचा हा सर्व राडा महिला कर्मचाऱ्याच्या ‘बॉडी कॅमेऱ्या’त हुबेहूब रेकॉर्ड झाला आहे. या प्रकरणी सुरासे यांच्या तक्रारीवरून जिन्सी ठाण्यात पसार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.