मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. नागा आणि कुकी समुदायामध्ये झालेल्या हिंसक संघर्षामध्ये गेल्या २४ तासांत ९ जणांचा मृत्यू झाला असून १४ घरांना आग लावण्यात आली आहे. या घटनेमुळे कुकी आणि नागा समुदायांमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. कांगपोकपी जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचारात कामजोंग जिल्ह्यात गोळीबारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच कामजोंग आणि कांगपोकपीमध्ये परिस्थिती गंभीर आहे. या हिंसाचारामुळे कामजोंग जिल्हा प्रशासनाने चसाद पोलीस स्टेशनच्या ४०० मीटर परिसरात लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घातली आहे.
कुकी संघटना 'कमेटी ऑन ट्रायबल युनिटी'ने कांगपोकपी जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ६ वाजेपासून २४ तासांच्या बंदची हाक दिली आहे. चसाद पोलीस स्टेशनजवळ झालेल्या गोळीबारात ४२ वर्षीय कुकी महिला आणि पाच मुलांची आई असलेल्या डोमखोनी टौथांग हिचा मृत्यू झाल्यानंतर या हिंसाचाराने उग्र रूप धारण केलं.पोलीस स्टेशनजवळ बेकायदेशीर बंकर बांधल्याच्या माहितीवरून पोलीस, इंडिया रिझर्व्ह बटालियन आणि सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी ते हटवण्यासाठी एक मोहीम सुरू केली होती. याच दरम्यान अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला आणि जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. तेव्हा स्थानिक महिलांनी या मोहिमेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.