लंडन येथे उच्चशिक्षणासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील 34 वर्षीय मुग्धा अविनाश देशमुख या तरुणीचा मृतदेह पिंपरी-चिंचवडजवळील गहुंजे येथील 'लोढा बेलमोंडो' या आलिशान सोसायटीतील एका बंद फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
मुग्धा या छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे निवृत्त मुख्य अभियंता अविनाश देशमुख यांच्या कन्या आहेत. जुलै 2025 मध्ये त्या एमबीएच्या शिक्षणासाठी लंडनला गेल्या होत्या. लंडनमध्ये असताना त्या दररोज घरच्यांशी संपर्कात होत्या. मात्र, 23 ऑक्टोबर 2026 रोजी आईशी शेवटचे बोलणे झाल्यानंतर त्यांचा अचानक संपर्क तुटला.
कुटुंबाला लंडनमध्ये असल्याचे वाटले, पण...
मुग्धा यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी लंडन येथील त्यांच्या मैत्रिणीमार्फत विचारपूस केली. त्यावेळी मुग्धा यांनी ऑगस्ट 2026 च्या शेवटीच लंडन सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली. लंडन सोडून भारतात परतल्यानंतरही त्यांनी कुटुंबीयांना याबाबत कोणतीही कल्पना दिली नव्हती. भारतीय उच्चायुक्तांकडून काही प्रतिसाद न मिळाल्याने चिंतेत असलेल्या पालकांनी उस्मानपुरा (छत्रपती संभाजीनगर) पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
ऑनलाइन फूड ऑर्डर आणि क्रेडिट कार्डने उलगडले गूढ
तपास दरम्यान पोलिसांनी मुग्धा यांच्या बँक खात्यांचे व्यवहार आणि डिजिटल फुटप्रिंट्स तपासले. त्यात भारतातील झोमॅटो , ब्लिंकिट आणि स्विगी सारख्या ऑनलाइन फूड ॲप्सवर त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यावरून त्या लंडनमध्ये नसून भारतातच असल्याचे निश्चित झाले. तांत्रिक तपासावरून पोलिसांचे पथक गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीत पोहोचले. तेथील फ्लॅटचा दरवाजा बंद असल्याने पोलिसांनी बनावट चावीने दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी बेडरूममध्ये मुग्धा यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
शिरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे. मुग्धा ऑगस्ट 2026 पासून गहुंजे येथील या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. त्यांनी 21 ऑक्टोबर रोजी आपल्या कामावर असलेल्या मोलकरणीलाही काम बंद करण्यास सांगितले होते.
मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल आणि मोबाईलच्या फॉरेन्सिक विश्लेषणानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.