दिल्लीत रणकंदन! ३८ हजार पोलिसांचा पहारा झुगारून ज्ञानेश कुमारांविरोधात लाखांचा वणवा; ३ माजी मुख्यमंत्र्यांसह ४ हजार जण ताब्यात!
दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे चलो जंतर मंतर आंदोलन मोडित काढण्याचा चंग बांधूनही दिल्लीत अभूतपूर्व प्रतिसाद आंदोलनाला मिळाला. शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर दिल्ली पोलिसांनी आंदोलन चिरडण्यासाठी बळाचा वापर करत तब्बल 4 जणांना ताब्यात घेत डांबून ठेवलं आहे.
यामध्ये सीजेपी संस्थापक अभिजित दिपके, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पिनारायी विजयन, अरविंद केजरीवाल, ध्रुव राठी, नेहा बोरा, योगेंद्र यादव यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेत छावण्यांमध्ये रवानगी केली. तब्बल 4 हजार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे सीजेपी आंदोलक सायंकाळी 6 वाजेपर्यंत जंतर मंतरवर पोहोचू शकले नाहीत. पोलिसांनी दिल्ली विमानतळावर सीजेपी नेतृत्वातील सदस्य अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले होते. दिपके यांनी आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदे यांच्या खांद्यावर दिली असून गेल्या आठ तासांपासून संपर्क नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
दिल्ली पोलिसांच्या अभूतपूर्व नाकेबंदीनंतरही दिल्लीसह देशभरात ज्ञानेशकुमारांविरोधात वणवा पेटल्याचे चित्र दिसून आले. आंदोलनात जेन झी, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, वकील संघटनांचा सहभाग दिसून आले. मुंबई, पुणे, नाशिकमध्येही नागरिक रस्त्यावर उतरल्याचे दिसून आलं. त्यामुळे जंतरमंतरवर आंदोलकांना पोहोचता आलं नसलं, तरी जिथं पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तिथंच जंतरमंतर झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे, सीजेपीने सकाळी 10 वाजता जंतर मंतरवर आंदोलनाचे आवाहन केले होते. समर्थकांनी तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक ठिकाणी लावलेल्या तीन ते पाच थरांच्या बॅरिकेड्समुळे त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले.
पोलिसांशी झालेल्या संघर्षाच्या एक-दोन घटना घडल्या. आंदोलकांनी आकाशवाणी भवनजवळ बॅरिकेड्स तोडले आणि दगडफेक केली, ज्यात दोन पोलीस जखमी झाले. मतदार यादी आणि एसआयआरमधील अनियमिततेचा निषेध करण्यासाठी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी सीजेपीने जंतर मंतरवर आंदोलनाचे आवाहन केले होते.
पोलिसांनी आंदोलन कसं चिरडून काढलं?
8 ते 12 ऑक्टोबर दरम्यान, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) 221 कंपन्या, म्हणजेच अंदाजे 23 हजार जवान तैनात करण्यात आले होते. याव्यतिरिक्त, किमान 15 हजार दिल्ली पोलीस कर्मचारी तैनात करण्याचे नियोजन होते.
दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेगाड्या 250 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. वाहने कोण भाड्याने घेत आहे आणि दिल्लीत किती लोक येत आहेत, हे निश्चित करण्यासाठी बस बुकिंगची तपासणी सुरू करण्यात आली.
विद्यापीठ आणि महाविद्यालय प्रमुख तसेच पीजी मालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखण्याचे आवाहन करण्यात आले.
45 मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्याची व्यवस्था करण्यात आली. जंतर मंतरसमोर10 फूट उंचीचे बॅरिकेड्स उभारण्यात आले. अश्रुधूर वाहनेही तैनात करण्यात आली होती.
इतर राज्यांतून येणाऱ्या मार्गांवर तपासणी वाढवण्यात आली. राजस्थानहून येणाऱ्या मार्गांवर, तसेच उत्तर प्रदेशच्या पूर्व दिल्ली आणि शाहदरा सीमांवरही पाळत ठेवण्यात आली. खिळे आणि बॅरिकेड्स लावण्यात आले.
संघर्षांचे रेकॉर्डिंग करण्यासाठी आघाडीवर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना 150 बॉडीकॅम देण्यात आले. आंदोलकांना ठेवण्यासाठी स्टेडियममध्ये तात्पुरत्या छावण्या उभारण्यात आल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.