🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे हादरलं ! संपत्तीच्या वादातून ८३ वर्षांच्या आजोबाने नातवाला गोळी झाडून संपवलं, कुटुंबाने अपघात असल्याचं भासवलं

पुणे हादरलं ! संपत्तीच्या वादातून ८३ वर्षांच्या आजोबाने नातवाला गोळी झाडून संपवलं, कुटुंबाने अपघात असल्याचं भासवलं


पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून ८३ वर्षीय आजोबांनी आपल्या ३३ वर्षीय नातवाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला रायफल साफ करताना अचानक गोळी सुटल्याने हा अपघात झाल्याचे भासवण्यात आले होते.

मात्र पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आजोबा मोतीराम मराठे यांना अटक केली असून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुटुंबातील अन्य पाच जणांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभय माणिक मराठे (३३) असे मृत तरुणाचे नाव आहे. अभय हे लोणावळा शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक माणिक मराठे यांचे पुत्र होते. ५ ऑक्टोबर रोजी लोणावळ्यातील भुशी गावातील हॉटेल मोतीरामच्या आवारात ही घटना घडली. सुरुवातीला अभय हे आजोबांची रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटल्याने जखमी झाल्याचे सांगण्यात आले. गोळी लागल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 
घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र शवविच्छेदनादरम्यान पोलिसांना मृत्यूच्या कारणाबाबत संशय निर्माण झाला. गोळी लागल्याने शरीरावर झालेली जखम आणि घटनास्थळावरील परिस्थिती यावरून हा अपघात नसून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी तपासली.

यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि लोणावळा शहर पोलिसांनी हॉटेलमधील कर्मचारी तसेच संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली. तपासात अभय आणि त्यांचे आजोबा मोतीराम मराठे यांच्यात प्रॉपर्टी आणि एका व्यवहारावरून वाद असल्याचे समोर आले.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर मोतीराम मराठे यांनी त्यांच्या परवानाधारक रायफलमधून अभय यांच्या दिशेने गोळी झाडली. गोळी लागल्याने अभय गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मोतीराम मराठे यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.