🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'उद्धव ठाकरेंचे सत्ताधाऱ्यांना उघड आव्हान: हिंमत असेल तर ईव्हीएम सोडून बॅलेट पेपरवर आणा निवडणुका!'

'उद्धव ठाकरेंचे सत्ताधाऱ्यांना उघड आव्हान: हिंमत असेल तर ईव्हीएम सोडून बॅलेट पेपरवर आणा निवडणुका!'


महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच केंद्रबिंदू ठरलेल्या शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकार आणि भाजपवर अत्यंत प्रखर शब्दांत हल्लाबोल केला. निवडणुकांमध्ये गैरप्रकार करून हे लोक सत्तेवर बसले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तुमच्यात खरी मर्दुमकी असेल, तर ईव्हीएम यंत्रे बाजूला ठेवा आणि थेट बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, असे उघड आव्हान त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांवरील दडपशाही, मुंबईच्या अस्मितेचा मुद्दा, बनावट हिंदुत्व आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवरून सरकारला अक्षरशः धारेवर धरले.

मोदी-शहांना रावणाची उपमा

मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत एक टोकदार राजकीय भाष्य केले. ज्याप्रमाणे रामायणकाळात बिभीषण आणि श्रीरामाने रावणाचा वध करण्यासाठी त्याचा जीव त्याच्या बेंबीत असल्याचा भेद उघड केला था, अगदी तसाच आज मोदी आणि शहा यांचा खरा जीव मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यात अडकला आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.





मते चोरून सत्तेची सूत्रे बळकावणाऱ्या या नेत्यांची पोलखोल करताना ते म्हणाले की, दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार झाल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले. अनेक तरुणांच्या अंगावर लाठ्यांचे वळ उठले आहेत, डोक्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत. 'मेलो तरी चालेल, पण आता मागे हटणार नाही' हा त्या तरुणांचा रोष पेपरफुटीविरोधातील आणि गेल्या 12 ते 20 वर्षांच्या अनन्वित छळाविरोधातील होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे स्मरण

आंदोलनात रस्त्यावर उतरलेल्या तरुण वर्गाला 'दिमागी नक्षल' आणि गुन्हेगार ठरवणाऱ्या प्रवृत्तीचा त्यांनी तीव्र निषेध केला. आंदोलक हे केवळ विद्यार्थीच नव्हते, तर गेल्या 12 वर्षांत प्रशासकीय व्यवस्थेकडून पिळले गेलेल्या सर्वसामान्यांचा तो आक्रोश होता. आई-वडील आपल्या कोवळ्या मुलांना घेऊन रस्त्यावर उतरत आहेत आणि तुम्ही त्यांविषयी काहीही बरळत आहात, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली.

याच वयातील तरुणांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावली होती, याचा विसर पडला का? असा सवाल करत त्यांनी अनंत कान्हेरे, भगतसिंग, चाफेकर बंधू यांसारख्या स्वातंत्र्यलढ्यातील विशीतील थोर क्रांतिकारकांचे स्मरण केले. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा रणांगणात शत्रूविरुद्ध लढायला उतरले, तेव्हा त्यांचे वय काय होते? अफजल खानने शिवरायांना हलक्यात घेत 'पहाड का चूहा' म्हटले होते, मात्र अवघ्या 29 वर्षांच्या शिवरायांनी काय पराक्रम केला, हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. आज त्याच वयाच्या मुलांना नक्षल आणि 'झुरळ' असे हीन पातळीवर जाऊन संबोधले जात आहे, ही कुठल्या प्रकारची मानसिक विकृती आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

पोलिसांना दबावाखाली न वागण्याचे आवाहन

सामान्य जनतेवर आणि आंदोलकांवर दडपशाही करणाऱ्या पोलिसांना खडेबोल सुनावताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, आज लोक दाद मागण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत, मात्र बोलून न्याय मिळत नसेल तर जनतेने अखेर करायचे तरी काय? कोणालाही पोलिसांचा ससेमिरा पाठीशी लावून घेण्याचा किंवा कुटुंबावर संकटे ओढवून घेण्याचा शौक नसतो.

ते म्हणाले की, पोलिसांना माझे स्पष्ट सांगणे आहे की त्यांनी सत्तेच्या तालावर लांडग्यासारखे वागू नये. कोणावरही दंडुका उगारताना तो उद्या आपल्याच अंगावर उलटणार नाही ना, याचा विचार करून पावले उचलावीत. शहरात तिरंगा यात्रा काढणाऱ्या सामान्यांच्या घराघरांवर नोटिसांचा पाऊस पाडला जातो, मात्र दुसरीकडे शहराच्या मध्यभागी उघडपणे गुन्हेगार आणि मारेकरी फिरून गोळीबार करतात, तिकडे मात्र यंत्रणांचे दुर्लक्ष होते, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

मुंबईची अस्मिता आणि मराठी माणसाचा अधिकार

मुंबईच्या समृद्ध अस्मितेचा मुद्दा मांडताना ठाकरे आक्रमक झाले. काही लोक मुंबईत येऊन सर्रासपणे 'घाटकोपरची भाषा गुजराती आहे' अशी भाषा वापरतात, यावर कडाडून विरोध दर्शवत ते म्हणाले की, महाराष्ट्र हे जरी बहुभाषिक राज्य असले, तरी हा महाराष्ट्र मूळचा मराठी माणसाचाच आहे. आमचे काही लोक सत्तेच्या लाभापोटी शेपूट घालून गप्प बसले आहेत, ते आता आम्हाला हिंदुत्वाचे धडे देणार का? लाचारी पत्करत आणि बूट चाटत हे लोक महाराष्ट्राची भाषिक ओळख आणि संस्कृती समूळ नष्ट करायला निघाले आहेत. यापूर्वीही गुजरातला मुंबई मिळवण्यासाठी अनेक कुटिल प्रयत्न झाले होते, परंतु मराठी माणूस छाती काढून ताठ उभा राहिला, म्हणूनच मुंबई महाराष्ट्राच्या हद्दीत राहिली. जर कोणाला असे वाटत असेल की शिवसेना संपवली की मुंबईचा घास सहज घेता येईल, तर त्यांनी लक्षात ठेवावे की, मराठी माणूस प्रसंगी पोट फाडून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही.

"साहित्यात आणि विचारांत विष कालवले गेले

विद्यापीठांमधील अभ्यासक्रम आणि पुस्तकांच्या संदर्भात बोलताना ठाकरे म्हणाले की, विद्यापीठांच्या ग्रंथालयांमधून आणि अभ्यासक्रमातून काही महत्त्वपूर्ण पुस्तके सक्तीने काढून घेतली जात आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महामानव महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्यात आणि विचारांत विष कालवले गेले आहे, असा खोटा दावा करून ती पुस्तके हटवण्याचे फतवे काढले जात आहेत.

एखाद्या बिनबापाच्या नावाच्या सोशल मीडिया हँडलवरून अशी मागणी होते आणि पंतप्रधान कार्यालय त्यावर तातडीने गांभीर्याने फतवे जारी करते. जोपर्यंत समाज सर्वार्थाने सुधारत नाही, तकपर्यंत देशाचे खरे स्वातंत्र्य टिकू शकत नाही, असे सांगत त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची आठवण करून दिली. शिवसेनाप्रमुखांनी राजकारणात नक्कीच धर्म आणला होता, परंतु तो कधीही संकुचित स्वरूपाचा नव्हता; उलट तो 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारणाचा त्रिवेणी संगम होता. मराठी माणसाला आणि हिंदूंना जगात ताठ मानेने जगण्याचा आत्मविश्वास मिळवून देण्यासाठीच शिवसेनेची स्थापना झाली असून ते गाडगेबाबांच्या समाजसुधारणेच्या विचारांचे अस्सल हिंदुत्व होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

"आमचे हिंदुत्व हे शेंडी-जनाव्यापुरते मर्यादित नाही"

सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रहार करताना ते म्हणाले की, बाबरी ढाचा पाडण्यात आला तेव्हा आज स्वतःला मोठे हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे हे लोक कुठे बिळा लपून बसले होते? बाबरी पडली तेव्हा हे सगळे जण शेपूट घालून बसले होते. आमचे हिंदुत्व हे शेंडी-जनाव्यापुरते मर्यादित नसून ते देशावरील निस्सीम राष्ट्रप्रेमाचे आहे. जिवाची तिळमात्र पर्वा न करता ऐन रणधमाळीत मैदानात धावणारा कार्यकर्ता हाच आमचा खरा शिवसैनिक आहे.

आज राजकारणासाठी धर्माचा सोयीस्कर वापर केला जात आहे. 'हातात काम नाही आणि जय श्री राम' असा नारा देणारे हे आमचे हिंदुत्व कदापि असू शकत नाही; तर उलट 'हाताला पोटासाठी काम आणि मुखात अखंड जय श्री राम' हेच आमचे खरे आणि अस्सल हिंदुत्व आहे. आमचा देशबांधव मुस्लिम असेल तर त्याचा हिरवा रंग, दलित बांधव असेल तर त्याचा निळा रंग, किंवा इतर कोणत्याही घटकाचा कोणताही रंग असो, परंतु शेवटी आम्हा सर्वांचा एकमेव रंग आणि अभिमानाची शान असलेला आमचा 'तिरंगा' हाच आमचा सर्वस्व आहे, असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.