🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

८ महिन्यांच्या गरोदर निदा खानवर संकटांची मालिका; जामीन मिळताच पतीने ठोकला घटस्फोटासाठी कोर्टाचा दरवाजा!

८ महिन्यांच्या गरोदर निदा खानवर संकटांची मालिका; जामीन मिळताच पतीने ठोकला घटस्फोटासाठी कोर्टाचा दरवाजा!


नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत तरुणी आणि तरुणाचे कट रचून धर्मांतर करण्याच्या गंभीर गुन्ह्यांतील संशयित आरोपी निदा एजाज खान  हिच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या न्यायालयीन प्रक्रियेचा सामना करत असलेल्या निदासमोर आता वैवाहिक आयुष्यातील मोठे संकट उभे ठाकले आहे. आठ महिन्यांची गरोदर असलेल्या निदाच्या कौटुंबिक कलहाने विकोप गाठल्याने तिच्या पतीने थेट न्यायालयात घटस्फोटासाठी  अर्ज दाखल केला आहे. या अर्जाची दखल घेत न्यायालयाने निदाला समन्स  बजावले असून, 16 ऑक्टोबर रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात एका बहुराष्ट्रीय कंपनीतील पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हानिफ शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, मुंबई नाका पोलीस ठाण्यात  याच कंपनीतील एका तरुणाच्या तक्रारीवरून तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन याच्यासह निदा खान हिच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांत नाशिकरोड आणि नाशिक जिल्हा न्यायालयाने तिला सशर्त जामीन मंजूर केला आहे.

बदनामीमुळे पतीने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याची माहिती

26 मार्चपासून या गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव आल्यानंतर पोलीस तपास आणि न्यायालयीन चौकशीच्या सावटाखाली निदाच्या वैवाहिक आयुष्यात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. 2 ते 3 वर्षांपूर्वीच तिचे लग्न झाले होते. या प्रकरणामुळे झालेली प्रचंड बदनामी आणि ओढावलेल्या नामुष्कीमुळे खचून जात तिच्या पतीने अखेर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एकाच वेळी गरोदरपण, कायदेशीर लढाई, सामाजिक दबाव आणि संसार तुटण्याची भीती अशा बिकट परिस्थितीचा सामना निदाला करावा लागत आहे.

जामीन देताना न्यायालयाने दिला होता 'श्रीकृष्णाचा' संदर्भ
यापूर्वी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने अत्यंत संवेदनशील निरीक्षण नोंदवले होते. बाळाचे हित आणि मानवी हक्क महत्त्वाचे असल्याचे सांगत न्यायालयाने म्हटले होते की, "भगवान श्रीकृष्णाचा जन्मही कारागृहात झाला होता. मात्र, आजच्या आधुनिक आणि सुसंस्कृत समाजात कोणत्याही निष्पाप नवजात बाळाला तुरुंगातील वातावरणाचा सामना करावा लागू नये." या भावनावश संदर्भानंतर तिला जामीन मिळाला खरा, मात्र आता बाळाच्या जन्मापूर्वीच तिचे वैवाहिक आयुष्य धोक्यात आल्याने न्यायालयीन वर्तुळात या विषयावर जोरदार चर्चा रंगली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.