तुम्हीही केळी खाल्ल्यानंतर त्यांची साले फेकून देत असाल, तर आता असे करू नका. येथे आम्ही तुम्हाला केळीच्या सालींचे जबरदस्त फायदे सांगणार आहोत. हे फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. केळे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ आहे. मात्र, केळे खाल्ल्यानंतर आपण अनेकदा त्याची साल निरुपयोगी समजून कचरापेटीत फेकून देतो.
पण तुम्हाला माहिती आहे का, केळीच्या सालींमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, ओमेगा-३ आणि अनेक अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक केवळ झाडांसाठी उत्तम नैसर्गिक खत म्हणून काम करत नाहीत, तर घराच्या स्वच्छतेसह दैनंदिन कामांमध्येही उपयोगी ठरू शकतात.केळीच्या साली फेकून देण्याऐवजी त्या गोळा करून योग्य पद्धतीने वापरल्यास महागडे लेदर पॉलिश, झाडांसाठीची खते आणि स्वच्छतेची उत्पादने यांवर पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही. चला तर मग, जाणून घेऊया केळीच्या सालींच्या मदतीने घरातील ५ महत्त्वाची कामे सोपी करण्याच्या भन्नाट पद्धती!
लेदरचे शूज आणि जॅकेट चमकवा
वापरण्याची पद्धत: लेदरचे बूट, बॅग किंवा जॅकेटवर केळीच्या सालीचा आतील (पांढरा) भाग घासून घ्या. त्यानंतर सुती आणि कोरड्या कापडाने पुसून घ्या. यामुळे लेदरला लगेच नव्यासारखी चमक येईल.
चांदीची भांडी आणि दागिन्यांची चमक परत आणा
वापरण्याची पद्धत: केळीच्या सालींमध्ये थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची मऊ पेस्ट तयार करा. ही पेस्ट काळवंडलेल्या चांदीच्या भांड्यांवर किंवा दागिन्यांवर लावा आणि ५ मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर मऊ कापडाने पुसून स्वच्छ धुऊन घ्या.
घरातील शोभेच्या झाडांची पाने स्वच्छ करा
वापरण्याची पद्धत: मनी प्लांट किंवा मोठी पाने असलेल्या घरातील शोभेच्या झाडांवर साचलेली धूळ काढण्यासाठी केळीच्या सालीचा आतील भाग पानांवर हलक्या हाताने घासा. यामुळे पाने स्वच्छ होतील आणि चमकदारही दिसतील.
दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय
वापरण्याची पद्धत: केळीच्या सालीचा आतील भाग दररोज २ मिनिटे दातांवर हलक्या हाताने घासा आणि त्यानंतर ब्रश करा. केळीच्या सालींमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम दातांवर साचलेला पिवळेपणा नैसर्गिकरीत्या दूर करण्यास मदत करतात, असा दावा केला जातो.
झाडांसाठी सेंद्रिय खत तयार करा
वापरण्याची पद्धत: केळीच्या सालींचे छोटे तुकडे करून ते मातीत पुरून टाका किंवा २ ते ३ केळींच्या साली १ लिटर पाण्यात २ दिवस भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी झाडांच्या मुळांजवळ घाला. यामध्ये असलेल्या पोटॅशियम आणि फॉस्फरसमुळे झाडांना नवीन फुले आणि फळे लवकर येण्यास मदत होते, असे मानले जाते.
टीप : केळीच्या सालींनी दातांचा पिवळेपणा दूर होतो, याला ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. तसेच लेदरच्या वस्तू, चांदीचे दागिने आणि नाजूक पानांवर सालींचा वापर करण्यापूर्वी छोट्या भागावर चाचणी करावी.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.