उत्तर प्रदेशमधील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे निकाल हाती आले असून, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत एकूण ११ पैकी ६ जागा जिंकून भाजपने आपला गड राखण्याचा प्रयत्न केला असला तरी, ५ जागांवर सपाने मुसंडी मारत भाजपला मोठा धक्का दिला आहे.
विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसी आणि शहरी बालेकिल्ल्यांमध्ये समाजवादी पक्षाच्या सायकलने जोरात वेग घेतला असून, आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
कुठे कुणाला विजय मिळाला?
भाजपने लखनऊ शिक्षक मतदारसंघ, मेरठचे दोन्ही (शिक्षक आणि पदवीधर) मतदारसंघ, बरेली-मुरादाबाद शिक्षक मतदारसंघ, गोरखपूर-फैजाबाद शिक्षक मतदारसंघ आणि आग्रा पदवीधर मतदारसंघ अशा एकूण ६ जागांवर विजय मिळवला.
मात्र समाजवादी पक्षाने अनपेक्षितरित्या भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्ये जोरदार मुसंडी मारली. सपाने वाराणसी-मिर्झापूर शिक्षक मतदारसंघात विजय मिळवला आणि वाराणसी पदवीधर जागेवरही आघाडी घेतली. तसेच आग्रा आणि लखनऊसारख्या भाजपच्या मजबूत मानल्या जाणाऱ्या पट्ट्यांमध्ये सपाने जोरदार मुसंडी मारत आपली ताकद दाखवून दिली.
भाजपसाठी धोक्याची घंटा का?
११ पैकी ६ जागा जिंकूनही या निकालाने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. या निवडणुका शिक्षक आणि पदवीधर मतदारांच्या होत्या, जे समाजातील विचारवंत आणि सुशिक्षित वर्ग मानले जातात. जर शहरी, सुशिक्षित आणि पारंपारिकरित्या भाजपसोबत असलेला मतदार समाजवादी पक्षाकडे वळत असेल, तर आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सपा भाजपला मोठी टक्कर देऊ शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.