पुणे : पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणारी रुग्णवाहिका रस्त्यावरून धावत असतानाच तिचा मागील दरवाजा उघडला आणि रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला.
विशेष म्हणजे, रुग्ण खाली पडल्याचे चालकाच्या लक्षातही आले नसल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णवाहिकेतील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका रस्त्यावरून जात होती. त्याचवेळी अचानक रुग्णवाहिकेचा मागील दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच आत असलेले रुग्णाचे स्ट्रेचर रस्त्यावर पडले. त्यामुळे रुग्णाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला. रुग्णवाहिका पुढे निघून गेली, मात्र रुग्ण रस्त्यावर पडल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.
हा प्रकार लक्षात येताच रस्त्यावरील नागरिकांनी तातडीने रुग्णाच्या मदतीसाठी धाव घेतली. मात्र, रुग्णवाहिका चालकाला मागे काय घडले, याची माहिती नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काही नागरिकांनी दुचाकीवरून रुग्णवाहिकेचा पाठलाग केला. पुढे जाऊन त्यांनी रुग्णवाहिका थांबवली आणि चालकाला रुग्ण रस्त्यावर पडल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चालक रुग्णवाहिका घेऊन पुन्हा घटनास्थळी परतला.त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या रुग्णाला पुन्हा स्ट्रेचरसह रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून, तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रुग्णवाहिका म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला वेळेत आणि सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवण्याचे महत्त्वाचे साधन. अशा वाहनातूनच रुग्ण स्ट्रेचरसह रस्त्यावर पडण्याची घटना घडल्याने रुग्णांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.