मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सातत्याने आंदोलने होत आहेत. यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून आंदोलकांची धरपकड केली जात आहे. यातच आता पोलिसांवर एक धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी एका खासदाराला बेदम मारणा केल्याचा दावा आहे.
दिल्ली पोलिसांनी राज्यसभेचे खासदार जॉन ब्रिटास यांना बेदम मारहाण करून त्यांना रस्त्याच्या कडेला सोडून दिले, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) केला आहे. पक्षाने सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली असून ब्रिटास यांचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. जॉन ब्रिटास यांना मारहाण करून सोडून दिल्याची माहिती देत CPI(M) ने 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ब्रिटास हे त्यावेळी जखमी झालेले होते आणि वेदनेने त्रस्त होते. दिल्ली पोलिसांनी आता सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याचा आरोपही पक्षाने केला आहे.
पक्षाने व्हिडिओ शेअर केला असून ब्रिटास हे दिल्ली पोलिसांच्या व्हॅनच्या दरवाजाजवळ झोपल्याचे दिसत आहे. एक व्यक्ती त्यांना उठविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही व्हिडिओत दिसते. त्यांना उठण्यास त्रास होत असल्याचे आणि चालण्यासाठी एका व्यक्तीची मदत घेतल्याचे व्हिडिओत दिसते. एक व्यक्ती आणि दिल्ली पोलिसांचा एक कर्मचारी ब्रिटास यांना रिक्षापर्यंत चालत जाण्यास मदत करत असल्याचेही दिसते.दरम्यान, इंडिया आघाडीकडून मागील आठवड्यात सातत्याने ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. तर शनिवारी आणि रविवारी कॉक्रोच जनता पार्टीसह अन्य काही संघटनांनी दिल्लीत आंदोलन पुकारले होते. मात्र, पोलिसांनी आंदोलनाची तीव्रता वाढू नये, यासाठी हजारो आंदोलकांना ताब्यात घेतले. ब्रिटास यांच्यास डाव्या पक्षाचे नेते व पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.