🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाविकांच्या गर्दीत भरधाव ट्रक घुसल्याने भीषण अपघात; १२ ठार, ३९ जखमी

भाविकांच्या गर्दीत भरधाव ट्रक घुसल्याने भीषण अपघात; १२ ठार, ३९ जखमी


मध्यप्रदेश : नवरात्रीच्या उत्साहात ग्वाल्हेरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शीतला माता मंदिराच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. धान्याने भरलेल्या एका अनियंत्रित ट्रकने मंदिराबाहेर उभ्या असलेल्या शेकडो भाविकांना जोरदार चिरडले. या भीषण अपघातात 12 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, 39 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नवरात्रीमुळे रात्री उशिरापर्यंत मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होती. छिनोरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतार असून तिथे जड वाहनांच्या वाहतुकीवर पूर्ण बंदी आहे. असे असतानाही धान्याने भरलेला एक भरधाव ट्रक त्या रस्त्यावरून जात होता. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून तो ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला, पण चालकाने पोलिसांचे न ऐकता बॅरिकेड्स तोडून ट्रक वेगाने पुढे नेला.

रस्ता तीव्र उताराचा असल्यामुळे चालकाचा ट्रकवरील ताबा पूर्णपणे सुटला. अनियंत्रित झालेला हा ट्रक थेट मंदिराबाहेरील दुकाने आणि तेथे उपस्थित भाविकांना चिरडत मंदिराच्या भिंतीला व गेटला धडकला. या अचानक झालेल्या भीषण अपघातानंतर घटनास्थळी एकच आरडाओरड आणि गोंधळ उडाला. नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. 




माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी 12 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली. ग्वाल्हेरचे एसएसपी धर्मवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 39 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 5 ते 6 जणांची प्रकृती अत्यंत चिंतेची असून काहींना गंभीर फ्रॅक्चर झाले आहेत. विशेष म्हणजे, सुरक्षेसाठी तैनात असलेले दोन पोलीस कर्मचारीही या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.