🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साताऱ्यात १४ वर्षीय मुलीवर बलात्कार: तक्रारदाराच्या दारात लिंबू-टाचण्या; ‘अमावस्येपर्यंत केस मागे घे’ अशी धमकी

साताऱ्यात १४ वर्षीय मुलीवर बलात्कार: तक्रारदाराच्या दारात लिंबू-टाचण्या; ‘अमावस्येपर्यंत केस मागे घे’ अशी धमकी


सातारा: फलटणमध्ये अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मुलीला भूतबाधा झाल्याचे सांगून तिच्यावर कथित उपचार करण्याच्या बहाण्याने अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर आता पीडित कुटुंबाला गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावले जात असल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांच्या घराच्या दरवाजाजवळ धमकीची चिठ्ठी, लिंबू, हळद-कुंकू आणि टाचण्या आढळून आल्या. 'अमावस्येपर्यंत तक्रार मागे न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा आशयाची धमकी चिठ्ठीत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पीडित कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी फलटण शहर पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर धमकीचे प्रकार वाढल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडिता नववीत शिक्षण घेत होती. तिला भूतबाधा झाल्याचे सांगून संशयिताने कुटुंबाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर जादूटोणा करून कथितरीत्या तिच्या अंगातील भूत काढण्याचा बनाव करण्यात आल्याचा आरोप आहे. 

जुलै आणि ऑगस्ट 2024 या कालावधीत संशयित सौरभ मदने हा मुलीला शाळेत सोडण्याच्या बहाण्याने घेऊन जात होता. त्यानंतर तिला एका जुन्या घरात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने सांगितले. त्यामुळे भीतीपोटी तिने बराच काळ हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. नंतर ती वाई येथे गेल्यानंतर तिने कुटुंबीयांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. अशा घटनांमधून अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.