सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. इथं एका व्यक्तीचा करूण अंत झाला आहे. संबंधित व्यक्ती कामावरून घरी निघाली होती. मात्र अर्ध्या वाटेतून अचानक गायब झाली.
कुठे गेली? काय झालं? याचा काहीच थांगपत्ता कुटुंबीयांना नव्हता. मात्र सलग २४ तास शोध घेतल्यानंतर भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पाहून प्रत्येकाचं मन सुन्न झालं आहे. केवळ इंडिकेटर आणि आरशाच्या तुकड्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकं काय घडलं?
कामावरून घराकडे परतत असताना कार अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने ऐतवडे बुद्रुक येथील ४१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. धनंजय सुभाष शेटे (वय ४१, रा. ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर दोन दिवस चाललेल्या शर्थीच्या शोधमोहिमेनंतर गुरुवारी सकाळी क्रेन आणि विशेष आपत्कालीन यंत्रणेच्या साहाय्याने कारसह मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
कामावरून परतताना घडला भीषण अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय शेटे हे वारणानगर येथील वारणा संकुलात नोकरीस होते. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे काम संपवून ते आपल्या कारने ऐतवडे बुद्रुककडे परतत होते. चिकुर्डे-करंजवडे मार्गावरून जात असताना अचानक त्यांची कार रस्त्यालगत असलेल्या खोल विहिरीत कोसळली. रात्र उलटूनही धनंजय घरी न पोहोचल्याने आणि फोनवर संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी चिंताक्रांत होऊन त्यांचा शोध सुरू केला.
गाडीचे तुटलेले अवशेष बनले तपासाचा दुवा
बुधवारी शोध घेताना चिकुर्डे-करंजवडे रस्त्यावरील एका विहिरीजवळ धनंजय यांच्या कारच्या आरशाचे व इंडिकेटरचे तुटलेले तुकडे आढळून आले. यामुळे कार विहिरीत पडल्याचा तीव्र संशय बळावला. विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली असल्याने कार शोधण्यात मोठे अडथळे येत होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत चाललेली शोधमोहीम थांबवावी लागली.
त्यानंतर गुरुवारी पहाटे ६ वाजता कराड येथून विशेष क्रेन आणि पाणी उपसण्यासाठी हाय-पावर पंप मागवण्यात आले. कोल्हापूर येथील आपत्कालीन जीवरक्षक दिनकर कांबळे यांनी प्राणाची पर्वा न करता विहिरीत उतरून कारचा शोध घेतला. अखेर क्रेन व भक्कम दोरखंडांच्या साहाय्याने अथक प्रयत्नांनंतर मोटार व त्यात अडकलेला धनंजय यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
अत्यंत हसऱ्या आणि मनमिळाऊ स्वभावाच्या धनंजय यांच्या या अकाली निधनाने शेटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण ऐतवडे बुद्रुक परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.