🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणेकरांनो सावध! बाल्कनीत कपडे टाकले तर पालिका कारवाई करणार? प्रस्तावावर उठली संतापाची लाट!

पुणेकरांनो सावध! बाल्कनीत कपडे टाकले तर पालिका कारवाई करणार? प्रस्तावावर उठली संतापाची लाट!

पुणे: पुणे महानगरपालिकेकडून शहराच्या सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी नवनवे उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, प्रशासनाच्या एका प्रस्तावित निर्णयामुळे पुणेकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

शहराचा मुख्य चेहरामोहरा स्वच्छ आणि आकर्षक ठेवण्याच्या नावाखाली मुख्य रस्त्यालगतच्या सोसायट्यांमधील बाल्कन्यांमध्ये धुतलेले कपडे वाळवण्यावर थेट बंदी घालण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे.

पुणे हे झपाट्याने वाढणारे मेट्रो शहर असून शहराचे सौंदर्य अबाधित राखणे ही काळाची गरज असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना किंवा पर्यटकांना इमारतींच्या बाल्कन्यांमध्ये वाळत घातलेले कपडे दिसल्यामुळे शहराच्या दृश्य सौंदर्याला बाधा पोहोचते, असा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांकडे तोंड असलेल्या सदनिकांच्या बाल्कन्यांमध्ये कपडे लटकवण्यावर कायदेशीर नियंत्रण आणण्याचा विचार महापालिका करत आहे.

'स्वच्छ संवाद' कार्यक्रमात आयुक्तांचे संकेत


महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'स्वच्छ संवाद' या कार्यक्रमात महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी या प्रस्तावित निर्णयाचे संकेत दिले. मुख्य रस्त्यांकडे तोंड असलेल्या बाल्कनीत कपडे वाळत घातल्याने शहराच्या सौंदर्याला बाधा येत असून त्यावर बंदी घालण्याबाबत पालिका प्रशासन गांभीर्याने विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुक्तांच्या या वक्तव्यानंतर शहरात राजकीय, सामाजिक आणि नागरिक स्तरावर उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे.

नागरिकांमधून तीव्र विरोध


महापालिकेच्या या संभाव्य निर्णयावर पुणेकरांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये कपडे वाळत घालण्यासाठी बाल्कनी हाच एकमेव पर्याय असतो. अशा वेळी महापालिकेने कपडे वाळवण्यासारख्या वैयक्तिक व रोजच्या गरजेच्या गोष्टींवर बंदी घालण्याचा विचार करणे कितपत योग्य आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत. शहरात कचऱ्याची विल्हेवाट, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी यांसारख्या गंभीर समस्या प्रलंबित असताना महापालिका अशा अजब प्रस्तावांवर वेळ घालवत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.