🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आई की वैरीण? कात्रीचे वार करून पोटच्या चिमुकलीची निर्घृण हत्या; मन सुन्न करणाऱ्या घटनेने सांगली थरथरली!

आई की वैरीण? कात्रीचे वार करून पोटच्या चिमुकलीची निर्घृण हत्या; मन सुन्न करणाऱ्या घटनेने सांगली थरथरली!


सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील तिरमलवाडी-देशिंग परिसरातून एक सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. इथं एका महिलेनं आपल्या पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे. मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घरात कुणीही नसल्याची संधी साधून निर्दयी आईनेच आपल्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीवर कात्रीने वार केले. 
हा हल्ला इतका भयंकर होता की चिमुकलीचा जागीच तडफडून मृत्यू झाला. श्रीशा महादेव क्षीरसागर (वय १ वर्ष) असं हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे. ही हत्येची घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जन्मदातीनेच अशाप्रकारे पोटच्या मुलीला संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून हत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

घरात कुणी नसताना केली निर्घृण हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, मृत चिमुकलीचे वडील महादेव क्षीरसागर हे सलूनचा व्यवसाय करतात. मंगळवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या दुकानावर गेले होते. त्याचवेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा उठवत आई अनिता महादेव क्षीरसागर (वय २६, रा. तिरमलवाडी) हिने स्वतःच्याच पोटच्या गोळ्यावर घरातील कात्रीने हल्ला चढवला. अनिताने चिमुकलीच्या मान आणि शरीरावर कात्रीने गंभीर वार केले. या भीषण आणि क्रूर हल्ल्यात अतिरक्तस्त्राव झाल्याने चिमुकल्या श्रीशाचा घटनास्थळीच वेदनादायी मृत्यू झाला.

पोलिसांकडून संशयित आईला अटक
घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात रवाना केला. याप्रकरणी संशयित आई अनिता क्षीरसागर हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिच्याविरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आईने आपल्या अवघ्या वर्षभराच्या बाळाचा एवढ्या निष्ठुरपणे जीव का घेतला, यामागचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून कवठेमहांकाळ पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.