फक्त ५ रुपयांचा ऑनलाईन फॉर्म आणि ६.५० लाखांचा झाडू! निवडणूक आयोगाचा अधिकारी बनून सायबर भामट्यांनी लुबाडले
मुंबई : निवडणूक ओळखपत्रावरील नावात दुरुस्ती करून देण्याच्या बहाण्याने निवडणूक आयोगाचा अधिकारी असल्याचे भासवून एका सायबर भामट्याने मालाड येथील ७९ वर्षीय वृद्धाची ६ लाख ४८ हजार १७ रुपयांची फसवणूक केली.
नाव दुरुस्तीसाठी अवघे पाच रुपये शुल्क भरण्याच्या बहाण्याने भामट्याने वृद्धाकडून बँकेशी संबंधित कोड मिळवला आणि त्यांच्या खात्यातील मोठी रक्कम ऑनलाइन काढून घेतली. या प्रकरणी वृद्धाने बांगुरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून २६ ऑक्टोबरला गुन्हा दाखल झाला आहे.
सेवानिवृत्त असलेले रामनाधम फनिंद्र काजा (७९) हे मालाड पश्चिम येथील इव्हरशाइन नगर परिसरात राहतात. हे वृद्ध दांपत्य बँक बचतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. दैनंदिन आर्थिक व्यवहारांसाठी ते ॲक्सिस बँकेच्या मोबाइल ॲपचा वापर करतात. असाच त्यांना सायबर भामट्याने फोन करून गंडा घातला.
नावात दुरुस्तीची बतावणी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास काजा यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्याने आपण भारतीय निवडणूक आयोगाचा अधिकारी असल्याची बतावणी केली. काजा आणि त्यांच्या पत्नीच्या निवडणूक ओळखपत्रावरील नावात दुरुस्ती करायची असल्याचे सांगत त्यासाठी पाच रुपये ऑनलाइन शुल्क भरावे लागेल, असे त्याने सांगितले.
...आणि पैसे झाले वळते शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बहाण्याने त्याने काजा यांच्याकडे बँकेच्या मोबाइल ॲपशी संबंधित कोड मागितला. संबंधित व्यक्तीवर विश्वास ठेवून काजा यांनी हा कोड दिला. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी त्यांच्या ॲक्सिस बँकेच्या खात्यातून ६ लाख ४८ हजार १७ रुपये ७० पैसे ऑनलाइन वळते झाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.