🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'घर बांधून देईन' म्हणणाऱ्या विश्वजीत कदमांना बाणेदार उत्तर; विवेकानंद पाटील म्हणाले, "परिस्थितीचं भांडवल करायचं नाही!"

'घर बांधून देईन' म्हणणाऱ्या विश्वजीत कदमांना बाणेदार उत्तर; विवेकानंद पाटील म्हणाले, "परिस्थितीचं भांडवल करायचं नाही!"


सध्या पुण्यात सुरु असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात रोहित पवारांच्या बरोबरीने व्यासपीठ गाजवणाऱ्या आणि या आंदोलनाचा चेहरा झालेला विवेकानंद पाटील सध्या प्रचंड चर्चेत आहे. विवेकानंद पाटील याचे खुमासदार आणि मजेशीर शैलीतील निवेदन, भाषणं ही सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहेत. ग्रामीण समस्यांची जाण, तेथील राजकारणाची जाण, एमपीएससीच्या अभ्यासामुळे झालेल्या वाचनातून येत असलेले नानाविध संदर्भांची रेलचेल विवेकानंद पाटील  याचे जवळपास प्रत्येक भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संपूर्ण आंदोलनात  विवेकानंद पाटील याने एकहाती आंदोलकांच्या गर्दीला खिळवून ठेवण्यात आणि त्यांना व्यवस्थितपणे हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

विवेकानंद पाटील हा पुण्यात राहून एमपीएससीचा अभ्यास करत आहे. ग्रामीण भागातून आलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांप्रमाणे विवेकानंद पाटील याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. कोल्हापूरच्या राधानगरी येथील त्याचे आई-वडील राहत असलेले घर साधे विटांचे आहे. याचे फोटो अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी अलीकडेच पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती. त्यावेळी विश्वजीत कदम  यांनी विवेकानंद पाटील याच्या घराचा उल्लेख केला. विवेकानंदची परवानगी असेल तर येत्या काही दिवसांत विवेकानंदच्या आई-वडिलांसाठी एक चांगलं घर बांधण्याची जबाबदारी माझी, असे विश्वजीत कदम यांनी म्हटले. मात्र, बाणेदार स्वभावाच्या विवेकानंद पाटील याने विश्वजीत कदम यांच्या या ऑफरला नम्रपणे नकार दिला. 

मला माझ्या परिस्थितीचं भांडवल करायचं नाही. मी विश्वजीत कदम यांनी दिलेल्या प्रस्तावाबद्दल आभारी आहे. कदम साहेब म्हणाले की, मी घर बांधून देतो. माझ्याकडे काही पैसे नाहीत, अशातला भाग नाही. माझ्या मैत्रिणीने मला सहा हजारांचं टायटनचं घड्याळ दिले आहे. घर काय आज ना उद्या बांधता येईल. मी आज माझं करिअर दावणीला लावून इथे उभा आहे. माझ्यापेक्षाही खूप वाईट परिस्थिती तुकाराम मुंढेंची होती. ते रोज उधारीवर ऑम्लेट पावच्या गाडीवर जेवत होते. एक दिवशी त्याच्यासाठी पैसे नव्हते तर ते उपाशी झोपले. तुकाराम मुंढेंनी कुठेही परिस्थितीचे भांडवल केले नाही. त्यामुळे मला मोठ्या मनाने माफ करा. घर मी आज ना उद्या बांधेन. तुम्ही बोललात त्याने मला दहा हत्तीचं बळ मिळालं. माझ्यासारख्या अनेकांनी शुन्यातून विश्व निर्माण केले आहे. लांबचं कशाला दिवंगत पतंगराव कदम साहेबांचं उदाहरण घ्या. त्यांनीही शुन्यातून विश्व घडवलं. त्यांनाही कोणीही मदत केली असती पण त्यांनी ती घेतली नाही. मलाही तशीच कोणाची मदत घ्यायची नाही, असे विवेकानंद पाटील याने म्हटले.

विवेकानंद पाटील याने ही सगळी भावनिक मांडणी करत असताना शेवटाला मजेशीरपणे हा विषय संपवला. विवेकानंद पाटील याने विश्वजीत कदम यांना म्हटले की, 'दादा तुम्ही घर बांधून द्याल. पण उद्या मी 2029 ला लोकसभेचा फॉर्म भरायचा म्हटलो आणि ती जागा चुकून काँग्रेसला सुटली तर मग तुम्हीच म्हणाल लेका थांब', अशी मिश्कील टिप्पणी विवेकानंद पाटील यांनी केली. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तेव्हा विश्वजीत कदम यांनी एखादा कसलेला राजकारणी मिळालेला नकारही किती खिलाडूपणे घेतो आणि हजरजबाबीपणे परिस्थिती कशी सांभाळतो, हे दाखवून दिले. विवेकानंद पाटील यांचे वाक्य संपता संपता विश्वजीत कदम हे उठून उभे राहिले आणि म्हणाले की, 'कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलाला विचारुन करायचं आपण'. विश्वजीत कदम यांचं हे वक्तव्य ऐकून उपस्थितांमध्ये पुन्हा हास्याची कारंजी उडाली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.