🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विद्यार्थ्यांच्या अतरंगी हेअरस्टाइलला चाप! 'आधी गुरुजींना भेटा, मगच कैची लावा'; सांगलीतील शिक्षकाचा भन्नाट 'कटिंग फंडा' सोशल मीडियावर हिट

विद्यार्थ्यांच्या अतरंगी हेअरस्टाइलला चाप! 'आधी गुरुजींना भेटा, मगच कैची लावा'; सांगलीतील शिक्षकाचा भन्नाट 'कटिंग फंडा' सोशल मीडियावर हिट


सांगली : हल्लीच्या काळात फॅशन वेगाने बदलतेय आणि त्यासोबतच शालेय विद्यार्थ्यांच्या हेअरस्टाईलमध्येही मोठा बदल पाहायला मिळत आहे. कुणाच्या डोक्यावर विचित्र कट तर कुणाच्या केसांना फॅशनचा रंगीत तडका मुलांच्या या भन्नाट हेअरस्टाईल पाहून ही शाळा आहे की फॅशन शो?

असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. मुलांच्या या मनमानी हेअरस्टाईलमुळे पालकही त्रस्त झाले होते. केस कापण्यावरून घरात रोज किरकिरी व्हायची आणि पालकांना मुलांसमोर हतबल व्हावे लागायचे. मात्र, सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील लक्ष्मीवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी या समस्येवर एक अतिशय कल्पक आणि भन्नाट उपाय शोधून काढला आहे. शाळेतील शिक्षकांनी पालकांशी संवाद साधून एक सोपा नियम केला. मुलांचे केस कापायला जाण्यापूर्वी आधी गुरुजींना फोन करा, आता लक्ष्मीवाडीत मुलगा सलूनमध्ये गेला की पहिला फोन गुरुजींना जातो. 

फोन येताच शाळेचे शिक्षक थेट सलूनमध्ये पोहोचतात. सलूनच्या खुर्चीवर विद्यार्थी बसलेला असतो, हातात मशीन आणि समोर स्वतः गुरुजी उभे असतात. शिक्षकांच्या उपस्थितीमुळे ना कसला विचित्र कट मारता येतो, ना फॅशनचा अतिरेक करता येतो. गुरुजींच्या देखरेखीखाली एकदम साधी, आणि शाळेच्या शिस्तीला अनुरूप अशी केशरचना केली जाते. थोडक्यात सांगायचे तर कटिंग विद्यार्थ्यांची, पण स्टाईल गुरुजींची असा अनोखा प्रकार येथे पाहायला मिळत आहे.
पालकांना दिलासा आणि विश्वासाचे वातावरण

विशेष म्हणजे शिक्षकांनी हा निर्णय विद्यार्थ्यांवर किंवा पालकांवर जबरदस्तीने लादलेला नाही, त्यांनी प्रथम पालकांशी चर्चा केली, त्यांना विश्वासात घेतले आणि मगच या उपक्रमाला सुरुवात केली. दररोजच्या डोकेदुखीपासून सुटका झाल्याने पालकांनीही शिक्षकांच्या या कल्पक प्रयोगाचे मनापासून स्वागत केले आहे. मुलांच्या हातात उद्याचे भविष्य आहे आणि या भविष्याला योग्य आकार देण्यासाठी शाळा आणि घर दोघांनी एकत्र येणे गरजेचे आहे, ही भावना या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून येते.

डोक्यावरची स्टाईल क्षणिक, पण डोक्यात रुजलेली शिस्त आयुष्यभराची
सलूनमध्ये चालणाऱ्या या मशीन आणि कात्रीची धार फक्त केसांवर नव्हती; तर ती मुलांच्या मनमानीला आळा घालणारी, शिस्तीची सवय लावणारी आणि त्यांना योग्य वळण देणारी होती. लक्ष्मीवाडीतील विद्यार्थ्यांच्या डोक्यावरची फॅशन थोडी कमी झाली असेल, पण त्यांच्या आयुष्यातील शिस्त मात्र अधिक घट्ट झाली आहे. कारण डोक्यावरची स्टाईल क्षणिक असते, पण बालवयात डोक्यात रुजलेली शिस्त आयुष्यभर साथ देते. लक्ष्मीवाडीच्या शिक्षकांचा हा अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला खऱ्या अर्थाने परफेक्ट कट देणारा ठरत असून, संपूर्ण परिसरात या प्रयोगाचे कौतुक होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.