🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"आशियाई पॅरा गेम्समध्ये ३ सुवर्णपदके जिंकणाऱ्या नीरज यादव यांची आत्महत्या; क्रीडा विश्वावर दुःखाचा डोंगर."

"आशियाई पॅरा गेम्समध्ये ३ सुवर्णपदके जिंकणाऱ्या नीरज यादव यांची आत्महत्या; क्रीडा विश्वावर दुःखाचा डोंगर."

भारतीय पॅरा-ॲथलेटिक्स विश्वाला मोठा धक्का बसला आहे. तीनवेळा आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारे नीरज यादव यांनी मंगळवारी रात्री फ्लॅटमध्ये जीवन संपवल्याची माहिती सूत्रांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिली.

४२ वर्षीय नीरज यादव F55 श्रेणीमध्ये खेळत होते. त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात बुधवारी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले.

रुग्णालयात पॅरालिम्पिक विजेता सुमित अंतिल आणि त्यांचा सहकारी पॅरा-ॲथलीट विपिन कसाना उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. यादव यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भारताचे मुख्य पॅरा-ॲथलेटिक्स प्रशिक्षक एस. सत्यनारायण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, यादव यांनी आत्महत्या केल्याचं आपल्याला समजल्याचं सांगितलं. “होय, नीरजने आत्महत्या केली आहे. मलाही हीच माहिती मिळाली आहे. त्याने काल रात्री त्याच्या फ्लॅटवर विष प्राशन केल्याचं मला सांगण्यात आलं. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि क्लेषदायक आहे”, असं सत्यनारायण म्हणाले.

नीरज यादव मानसिक तणावाखाली?

डोपिंगच्या (उत्तेजक द्रव्य सेवन) निलंबनामुळे ऐची-नागोया आशियाई पॅरा गेम्सला मुकावं लागल्याने यादव मानसिक तणावाखाली असण्याची शक्यता प्रशिक्षकांनी व्यक्त केली आहे. मात्र, त्यांच्या या टोकाच्या निर्णयामागची नेमकी परिस्थिती अद्याप अस्पष्ट आहे. “तो या क्रीडा स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असावा. आशियाई पॅरा गेम्समधील पदकांमुळे सरकारकडून मोठे रोख पुरस्कार आणि कायमस्वरूपी नोकरीच्या संधी मिळतात. परंतु त्याचे निलंबन संपले नसल्याने तो स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. या गोष्टीचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण तो नेमका कोणत्या परिस्थितीतून जात होता हे आपण खात्रीने सांगू शकत नाही”, असं सत्यनारायण यांनी पुढे सांगितलं.

उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेले नीरज यादव भारताच्या यशस्वी पॅरा-ॲथलीट्सपैकी एक होते. वयाच्या सातव्या वर्षी त्याला पोलिओ झाला होता, तरीही त्यांनी आपली क्रीडा क्षेत्रातील आवड जपली. २००५ ते २०१२ दरम्यान व्हीलचेअर टेनिस खेळल्यानंतर त्यांनी पॅरा-ॲथलेटिक्सकडे आपला मोर्चा वळवला.

तीन प्रकारांत सुवर्णपदके

२०१५ मधील दिल्ली राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत त्यांनी गोळाफेक (शॉट पुट), भालाफेक (जॅव्हलिन) आणि थाळीफेक (डिस्कस) या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके जिंकून मोठी कामगिरी केली होती. २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये यादवने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. तिथे त्याने पुरुषांच्या F55 भालाफेक प्रकारात २९.८४ मीटरचा आशियाई विक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदक जिंकले.

त्यानंतर २०२३ मध्ये झालेल्या हांगझोऊ आशियाई पॅरा गेम्समध्ये भालाफेक आणि थाळीफेक या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदके पटकावून त्यांनी आपल्या खात्यात एकूण तीन आशियाई पॅरा गेम्स सुवर्णपदकांची नोंद केली. परंतु, त्याचे क्रीडा आयुष्य डोपिंग प्रकरणामुळे अडचणीत आले होते. ऑक्टोबर २०२३ मध्ये बेंगळुरू येथे घेतलेल्या चाचणीत त्यांच्या नमुन्यामध्ये ‘स्टॅनोझोलॉल’ हे प्रतिबंधित अ‍ॅनाबॉलिक स्टिरॉइड आढळल्यानंतर राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेने त्यांना तात्पुरते निलंबित केले होते. याविरोधात त्याने शिस्तपालन प्रक्रियेद्वारे आपल्या नमुन्याची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती. अनेक शारीरिक आव्हानांवर मात करून आशियाई पॅरा-ॲथलेटिक्सच्या शिखरावर पोहोचलेल्या एका प्रतिभावान खेळाडूच्या आयुष्याचा असा दुर्दैवी अंत झाला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.