विरोधक आणि पोलीस प्रशासन यांच्यात अनेकदा खटके उडाल्याचे पाहायला मिळते. मात्र उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात भाजपा नेत्याशी पोलीस अधिकाऱ्यामध्ये जोरदार शाब्दिक वाद झाल्याचे समोर आले आहे. रुग्णालयासमोर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार घेऊन सीतापूरचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शुक्ला पोलीस ठाण्यात गेले. मात्र पोलीस अधिकारी स्वाती चतुर्वेदी यांच्याबरोबर त्यांचा वाद झाला.
या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजेश शुक्ला पोलीस ठाण्यात तावातावाने जातात आणि म्हणतात, “स्वातीजी, रुग्णालयाच्या गेटच्या बाहेर वाहतूक कोंडी झाली आहे. चालायलाही जागा नाही. काही ठिकाणी रुग्णवाहिका रस्त्यात अडकल्या आहेत.”पोलिसांना जाब विचारत असताना शुक्ला यांच्याकडून व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले जात होते. यावर वैतागलेल्या पोलीस अधिकारी स्वाती चतुर्वेदी म्हणाल्या की, तुम्ही माझा व्हिडीओ काढत आहात. तुम्ही जा आणि मला निलंबित करा. यापेक्षा अधिक तुम्ही काही करू शकत नाही. या विधानावर शुक्ला यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, मी तुमचा व्हिडीओ का काढू? मी फक्त अडचण सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ती सोडवणे हे तुमचे कामच आहे.
चुतर्वेदी यांना हटवले
यावर स्वाती चतुर्वेदी पुन्हा संतापल्या. त्या म्हणाल्या, माझी पोस्टमॉर्टम ड्युटी लावली आहे. तुम्हाला याची माहिती ठाणेप्रमुखाला द्यावी लागेल. हे माझे काम नाही. अर्धा तास चाललेल्या वादावादीनंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष तिथून निघून गेले. यानंतर त्यांनी सीतापूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुर अग्रवाल यांना याबाबतची माहिती दिली. यानंतर रात्री उशीरा चतुर्वेदी यांची रुग्णालयाबाहेरील पोलीस चौकीतून उचलबांगडी करण्यात आली.
शहरातील रुग्णालयाच्या समोर नेहमीच वाहतूक कोंडी असते, अशी तक्रार अनेकदा करण्यात आली होती. ई-रिक्षाची संख्या वाढल्यामुळे रुग्णवाहिकेलाही रुग्णालयात जाता येत नव्हते. वॉर्ड बॉयना रुग्ण अंगावर उचलून घेऊन जावे लागत होते. यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत होते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कुणीही पोलीस तिथे उपस्थित नव्हते.अर्चना शुक्ला नावाच्या स्थानिक रहिवाशाने आपल्या मुलीला घेऊन रुग्णालयात औषध घेण्यासाठी आल्या होत्या. मात्र चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन पळवली. यानंतर त्यांनी रुग्णालयाबाहेर असलेल्या पोलीस चौकीत जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वाती चतुर्वेदी यांनी त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार देत, त्यांना पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला.
स्वाती चतुर्वेदी यांच्या समर्थनार्थ आता समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी पोस्ट केल्या आहेत. दरम्यान समाजवादी पक्षाने या घटनेवर टीका केली आहे. महिला शक्तीबाबत बोलणाऱ्या भाजपाने एका कर्तव्यनिष्ठ महिला अधिकाऱ्याला न्याय द्यावा. स्वाती चतुर्वेदी यांची अचानक बदली का करण्यात आली. याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी समाजवादीच्या नेत्याने केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.