🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"मंत्रालयात चाललंय काय?" ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना धरले धारेवर!

"मंत्रालयात चाललंय काय?" ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना धरले धारेवर!


मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटींच्या आरोपांनंतर आणि त्यांनी माध्यमांना दिलेल्या ऑडिओनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून राजकारण सुद्धा तापले असून आता सत्ताधारीच एकमेकांना भिडले आहे.

तर, विरोधकांकडून या ऑडिओ क्लिपमधील सत्यता बाहेर आणावी, या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे. याच मुद्द्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा भाष्य केले आहे. त्यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संबंधित पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले असून दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिली आहे की, सध्या महाराष्ट्रात एक 'फ्रेंडशिप फाईल' ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी, या पक्षाच्या सोशल मीडियात महत्वाची भूमिका बजावणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे पण खरंतर भारतीय जनता पक्षाच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही युट्युब प्रभावक यांच्यातल्या मैत्रीची 'फ्रेंडशिप फाईल' ऑडिओ क्लिप. 

यात कोणी कोणाला 500 कोटी दिले इथपासून ते थेट माध्यमांना आम्ही कशी जरब दाखवू शकतो, ते एखादा भावनिक मुद्दा सरकारच्या अंगाशी आला तर लगेच त्या मुद्द्यापासून लोकांचं लक्ष कसं भरकटवायचं यासाठी नविन धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा कसा रेटला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे याचीही चर्चा करताना ऐकायला येत आहे. ही क्लिप खरंतर 29 मिनिटांची आहे. त्यातल्या 500 कोटींचा मुद्दा गाजतोय. त्यावर खुलासे येतील आणि यायलाच पाहिजेत. पण भारतीय जनता पक्ष काय पद्धतीने समाज माध्यमं, माध्यमं यांच्यावर दडपशाही आणत आहे यावर पण चर्चा व्हायला हवी, अशी स्पष्ट मागणी ठाकरेंकडून करण्यात आली आहे.  तसेच, मुख्यमंत्र्यांनी मी ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला आहे असं म्हणून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला आहे. फॉरेन्सिक अहवाल हा ऑडिओ किंवा व्हिडिओची तथ्यता याबरोबर खून, बलात्कार, आर्थिक घोटाळे यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यात पुराव्यांची तथ्यता तपासण्यासाठी मागवला जातो. 




खरतर यातलं संभाषण ऐकलं तर समजतंच आहे की हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच आहे! म्हणजे जे बोललं आहे ते गंभीर आहे आणि त्याची तपासणी व्हायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना मान्य आहे हे बरं झालं. पुराव्यातील तथ्य तपासाच पण यांत बोललं गेलं आहे याबद्दल तुम्ही जर अनभिज्ञ असाल तर तुमच्या पाठीमागे काय काय सुरु होतं हे पण तपासा. मुख्यमंत्री म्हणाले की ही क्लिप बहुदा 2 वर्षांपूर्वीची असावी, ती आत्ताच का आली ? खरतर ही क्लिप बाहेर आली कशी आणि ती आणली कोणी हा पण महत्वाचा प्रश्न आहे. खरतर याच्यात सरकार मधलं नेहमीप्रमाणे शहा काट'शाहाचं' राजकारणच दिसतंय आणि हो फॉरेन्सिक अहवाल, त्यातील तांत्रिकता याच्यात महाराष्ट्राला गोल गोल घुमवू नका. महाराष्ट्राला जे कळायचं आहे ते कळलं आहे. ते तुम्हाला मान्य आहे आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती निष्पक्ष आहात आणि तुम्ही कारवाई केली आहेत हे महाराष्ट्राला दाखवून द्या. तरंच या फॉरेन्सिकला अर्थ आहे, अन्यथा तुमच्या फायद्यासाठी वाकवलेला फॉरेन्सिक ठरेल, असा टोला सुद्धा राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून लगावला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.