कल्याण: भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याविरोधात दाखल झालेल्या कथित सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाला एक महिन्याहून अधिक काळ उलटला आहे. मात्र, अद्याप नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांचा ठावठिकाणा लागलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
या दोघांचा शोध घेण्यासाठी पडघा पोलिसांनी सहा पथकं तैनात केली असून, विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. तरीही आरोपींचा शोध लागला नसल्याने तपासाच्या प्रगतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू असून नरेंद्र पवार यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथकं काम करत आहेत. मात्र, अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील एका विवाहित महिलेने मदत करण्याच्या बहाण्याने फार्महाऊसवर नेऊन बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या महिलेच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून दोघांचा शोध घेतला जात आहे. यासाठी सहा पथकं तयार करण्यात आली असून विविध ठिकाणी तपास केला जात आहे. रेल्वे स्थानकं आणि विमानतळांवरही शोधमोहीम राबवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अद्याप दोघांचा शोध लागलेला नसल्याचं सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात काँग्रेस सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी आरोपी नरेंद्र पवार यांना अटक न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, एक महिन्याहून अधिक काळ उलटूनही काँग्रेसकडून अद्याप कोणतेही आंदोलन करण्यात आलेले नाही. त्यामुळे नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्या भूमिकेवर आणि काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अटकपूर्व जामिनाचा अर्जही फेटाळला
या प्रकरणात नरेंद्र पवार यांच्या वतीने भिवंडी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. उपलब्ध माहितीनुसार, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे. तरीही नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील पोलिसांच्या हाती लागलेले नसल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाला एक महिन्याहून अधिक काळ उलटूनही आरोपींचा शोध लागलेला नसल्याने पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात तपास कुठपर्यंत पोहोचला आहे, आरोपींचा शोध घेण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत याकडे लक्ष लागलं आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झालटे आणि पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.