रुग्णालयांमध्ये एकदाच वापरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणांचा पुन्हा वापर करण्यावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालनालयाने यासंदर्भात देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये तसेच आरोग्य केंद्रांना निर्देश दिले आहेत.
वापरलेली उपकरणे निर्जंतुक करून पुन्हा वापरणे रुग्णांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशातील काही रुग्णालयांमध्ये एकदाच वापरण्यासाठी असलेल्या वैद्यकीय उपकरणांचा वेगवेगळ्या रुग्णांवर अनेकदा वापर केला जात असल्याच्या तक्रारी आरोग्य सेवा महासंचालनालयाला मिळाल्या होत्या. यामुळे रुग्णांना संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
सिंगल यूज मेडिकल डिव्हाइस म्हणजे एकदाच वापरण्यासाठी तयार केलेली वैद्यकीय उपकरणे. सुई, सिरिंज आणि काही प्रकारच्या डिस्पोजेबल वैद्यकीय उपकरणांचा यात समावेश होतो. या उपकरणांचा वापर केल्यानंतर त्यांची स्वच्छता किंवा निर्जंतुकीकरण करून पुन्हा वापर करण्याची परवानगी नाही. सर्व राज्यांच्या आरोग्य विभागांना आणि रुग्णालय प्रशासनांना या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. संबंधित उपकरणांवर उत्पादकाने दिलेल्या सूचनांनुसारच त्यांचा वापर करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आरोग्य संस्थांवर कठोर कारवाई केली जाऊ शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.