🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

१५,००० कर्मचाऱ्यांच्या लढ्याला मोठे यश! NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा शासन आदेश निर्गमित; सांगलीतील ३३० कर्मचाऱ्यांचा समावेश​

१५,००० कर्मचाऱ्यांच्या लढ्याला मोठे यश! NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा शासन आदेश निर्गमित; सांगलीतील ३३० कर्मचाऱ्यांचा समावेश


​'सांगली दर्पण'च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; उर्वरित कर्मचाऱ्यांनाही टप्प्याटप्प्याने कायम करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी.

​
सांगली:- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा कालावधी पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. राज्यातील १४,७८७ पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एकवेळची विशेष बाब म्हणून समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना नियुक्ती देण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने अधिकृत शासन निर्णयाद्वारे  मान्यता दिली आहे.




​या ऐतिहासिक निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील ३३० कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कायमसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक  आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या या ३३0 कर्मचाऱ्यांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
​
'सांगली दर्पण'च्या आवाजाला यश!

​राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यात यावे, त्यांच्यावर होणारा अन्याय दूर व्हावा आणि सेवांचे योग्य समायोजन व्हावे, यासाठी 'सांगली दर्पण'ने सातत्याने बातम्यांच्या माध्यमातून प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधून घेतले होते. कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या लढ्यात 'सांगली दर्पण'ने दिलेल्या या आवाजाला आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज मोठे यश मिळाले आहे.

 


​
शासन निर्णयातील ठळक बाबी:

​पात्रता निकष: २५ जून २०२६ रोजी तांत्रिक खंड वगळून १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी सेवा पूर्ण केलेले कर्मचारी.

​एकूण लाभार्थी: राज्यातील १४,७८७ पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एकवेळची विशेष बाब म्हणून समकक्ष अधिसंख्य पदे निर्माण केली जाणार आहेत.

​वार्षिक आर्थिक तरतूद: या अधिसंख्य पदांच्या वेतनासाठी अंदाजित रु. ९८३.८० कोटी (वार्षिक) खर्चास शासनाने मंजुरी दिली आहे.

​वेतन व पदसमकक्षता: कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हता आणि सध्याचे मानधन अभ्यासून सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग व इतर विभागांतील नियमानुसार त्यांची समकक्ष पदांवर नियुक्ती केली जात आहे.




​"उर्वरित कर्मचाऱ्यांनाही टप्प्याटप्प्याने कायम करा" — कर्मचाऱ्यांची भावना

​शासनाच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगलीतील कर्मचाऱ्यांनी 'सांगली दर्पण'शी संवाद साधला. ते म्हणाले, "शासनाने १० वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेऊन मोठा दिलासा दिला आहे. या लढ्यात 'सांगली दर्पण'ची भूमिका मोलाची राहिली. आता शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही आगामी काळात टप्प्याटप्प्याने कायम सेवेत घ्यावे, हीच आमची नम्र इच्छा आहे." ​दीर्घकाळ कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावणाऱ्या हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे मोठे सामाजिक व आर्थिक स्थैर्य मिळाले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.