मुंबई: महागड्या पेट-सीटी (PET-CT) तपासणीमुळे कर्करोगाचे निदान आणि उपचार रखडण्याची वेळ आता टळणार आहे. कर्करोगाचे अचूक निदान आणि वेळेत उपचार शक्य व्हावेत, यासाठी राज्य सरकारने ही तपासणी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबरोबरच कर्करोगावरील ६३ उपचार योजनांमध्ये अतिरिक्त निदान प्रक्रिया, तर १३ प्रकारच्या कर्करोगांसाठी स्वतंत्र तपासणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे कॅन्सर रुग्णांवरील उपचाराच आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. पेट-सीटी तपासणीचा खर्च परवडत नसल्याने अनेक रुग्ण ही तपासणी पुढे ढकलतात किंवा टाळतात. त्यामुळे आजाराचे अचूक स्वरूप समजणे आणि योग्य उपचार वेळेत सुरू करणे यामध्ये अडथळे निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन नागरिक आणि संबंधित रुग्णालयांकडून या तपासणीचा आरोग्य योजनांमध्ये समावेश करण्याची मागणी होत होती. त्यानुसार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार स्वतंत्र अभ्यास समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशींचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी ४४ उपचार पॅकेजमध्ये पेट-सीटी तपासणीचा अतिरिक्त निदान प्रक्रिया म्हणून समावेश होता. आता ही सुविधा ६३ उपचार पॅकेजपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. याशिवाय, निवडक १३ प्रकारच्या कर्करोग उपचारांसाठी पेट-सीटी स्कॅन स्वतंत्र किंवा नियमित निदान प्रक्रिया म्हणून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना आवश्यकतेनुसार या तपासणीचा लाभ घेता येईल. या सुविधेचा लाभ देताना संबंधित रुग्णालयांना शासन निर्णयातील अटींचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. तसेच, अंगीकृत रुग्णालयात आवश्यक तांत्रिक सुविधा, उपकरणे, पात्र मनुष्यबळ आणि स्वतःचे पेट-सीटी केंद्र असणे आवश्यक आहे. तपासणीपूर्वी पूर्वमान्यता घेणे आणि आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे सादर करणेही बंधनकारक राहणार आहे.
पेट-सीटी तपासणीचे निर्धारित दर
पेट-सीटी तपासणीसाठी पुढील दर निश्चित करण्यात आले आहेत.संपूर्ण शरीर - २०,४०० रुपयेमेंदू - १४,६५० रुपयेगॅलियम-६८ - १५,००० रुपयेहृदय - ९,४०० रुपयेपेट-सीटी तपासणीची सुविधा महात्मा फुले आरोग्य योजना तसेच आयुष्मान भारत योजनेत उपलब्ध झाल्याने कर्करोगाचे अचूक निदान आणि उपचारांचे वेळेत नियोजन करणे शक्य होईल. महागड्या तपासणीचा आर्थिक भार कमी करून कर्करोग रुग्णांना दिलासा देणारा हा निर्णय राज्याच्या कर्करोगविरोधी लढ्यात महत्त्वाचा टप्पा ठरेल. – प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.