आकाशात हजारो फूट उंचावर चाललेल्या विमानाचा ताबा घेऊन ते क्रॅश करण्याचा कट आणि कॉकपिटमध्ये घडलेला जीवघेणा हल्ला... अशा अत्यंत भयानक आणि भीषण प्रसंगात स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या भारतीय वंशाच्या कॅप्टन स्मित माछार यांच्या शौर्याची गाथा सध्या जगभरात गाजत आहे.
दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवला जाणाऱ्या 'फ्लाय दुबई'च्या विमानात ओमानच्या सह-वैमानिकाने केलेल्या आत्मघातकी हल्ल्याचा प्रयत्न कॅप्टन माछार यांनी हाणून पाडला. या असीम धैर्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले आहे.
'संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे' - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (X) विशेष संदेश शेअर करत कॅप्टन माछार यांच्या धैर्याला सलाम केला. ते म्हणाले, "कॅप्टन स्मित माछार हे खरे हिरो आहेत. अत्यंत गंभीर धोक्याचा सामना करावा लागलेला असताना आणि स्वतः गंभीर जखमी झालेले असतानाही, त्यांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी असीम धैर्य आणि अटूट संकल्प दाखवला. त्यांच्या वीरतेमुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले असून एक मोठी दुर्घटना टळली आहे. भारताला कॅप्टन माछार यांच्यावर गर्व आहे. ते लवकरात लवकर पूर्णपणे स्वस्थ व्हावेत आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी मी प्रार्थना करतो."
कॅप्टन माछार हे खरे नायक - नेत्यानाहू
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी भारतीय कॅप्टनच्या धाडसाला सलाम करत म्हटले, "कॅप्टन स्मित माछार यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याबद्दल मी त्यांना नमन करतो. शरीरात धारदार शस्त्र खुपसले गेल्यामुळे गंभीररित्या जखमी होऊनही ते लढले, त्यांनी कडवा प्रतिकार केला आणि विमानाच्या कॉकपिटचा दरवाजा उघडला. यामुळे प्रवासी आणि क्रू मेंबर्सना मिळून हल्लेखोराला काबूत आणता आले आणि एक भीषण अनर्थ टळला. कॅप्टन माछार यांनी इस्रायली नागरिकांसह 174 प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. ते खरे नायकाचे प्रतीक आहेत."
डोनाल्ड ट्रम्प यांनीही केले कौतुक
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, कॉकपिटमध्ये चाकूच्या हल्ल्याने गंभीर आणि रक्ताने माखलेले असतानाही कॅप्टन माछार यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडून मदतीसाठी हाक दिली. अशा अत्यंत बिकट परिस्थितीतही हार न मानणे आणि प्रसंगावधान दाखवणे असाधारण आहे. सह-वैमानिकाच्या मनसुब्यांवर बोलताना ट्रम्प म्हणाले की, "तो कदाचित दहशतवादी असावा किंवा कोणीतरी डोके फिरलेला सनकी असावा."
34,000 फूट उंचीवर घडला भयंकर थरार?
फ्लाय दुबईच्या FZ1073 या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर 34,000 फीट उंचीवर असताना अचानक नियंत्रण कक्षाला '7700' हा स्क्वॉक कोड पाठवण्यात आला. काही वेळातच विमानाने '7500' हा कोड प्रसारित केला, जो सामान्यतः विमान हायजॅक झाल्यास किंवा कोणत्याही बेकायदेशीर हस्तक्षेपाच्या वेळी वापरला जातो.
गंभीर जखमी असताना कॉकपिटचा दरवाजा उघडला
ओमानचा सह-वैमानिक फ्लाय दुबईच्या या विमानाचा ताबा घेऊन ते क्रॅश करण्याच्या तयारीत होता. त्याने अचानक कॅप्टन स्मित माछार यांच्यावर चाकूने ताबडतोब वार केले. चाकू लागून स्मित माछार गंभीर जखमी झाले, मात्र तरीही त्यांनी प्रतिकार करत कॉकपिटचा दरवाजा उघडला, जेणेकरून बाहेरून मदत मिळू शकेल. या विमानात इस्रायलचे 150 प्रवासी असल्याने हायजॅकिंगच्या शक्यतेने सर्वत्र खळबळ उडाली होती. विमानाने आपला मार्ग बदलून सौदी अरेबियाच्या दिशेने वळण घेतले. सुरक्षेसाठी इस्रायली फायटर जेट्स तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी विमानाला एस्कॉर्ट केले.
प्रवाशाने मारली कॉकपिटमध्ये उडी!
या संपूर्ण थरारात एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जेव्हा कॉकपिटचा दरवाजा उघडताच एक इस्रायली प्रवासी मदतीसाठी पुढे धावला. या प्रवाशाने कॉकपिटमध्ये थेट प्रवेश करून हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाला सीटवरून खाली खेचून पाडले. त्यानंतर इतर प्रवासी आणि केबिन क्रूने त्याला पूर्णपणे ताब्यात घेतले.
टीव्ही शोमधून शिकले नियंत्रण
ट्रम्प यांनी माध्यमांना सांगितले की, जेव्हा त्या प्रवाशाला त्याने हे सर्व कसे केले असे विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले की तो 'एयर डिजास्टर्स' या टीव्ही शोचा मोठा चाहता आहे. तो शो पाहूनच त्याने विमान नियंत्रणाची काही मूलभूत माहिती शिकून घेतली होती. यानंतर अतिरिक्त वैमानिकांनी विमानाचे नियंत्रण सांभाळले आणि जखमी कॅप्टन माछार यांनी सौदी अरेबियाच्या तबुक विमानतळावर विमानाचे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करून आणले.
कॅप्टन स्मित माछार यांच्यावर उपचार सुरू
भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित माछार हे 2022 मध्ये 'फ्लाय दुबई'मध्ये वैमानिक म्हणून रुजू झाले होते. त्यापूर्वी तब्बल 10 वर्षे ते 'स्पाइस जेट' मध्ये पायलट म्हणून कार्यरत होते. सध्या ते आपल्या कुटुंबासह दुबईत वास्तव्यास आहेत. या हल्ल्यात गंभीर दुखापत झालेल्या कॅप्टन माछार यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन 'फ्लाय दुबई' एयरलाईनने इस्रायलहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या आपल्या सर्व उड्डाणांना तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.