सांगली :- जिल्ह्यात शेतीमालाची चोरी करणाऱ्या गुन्हेगारांवर सांगली पोलिसांनी वचक निर्माण केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तासगाव तालुक्यातील जरंडी येथील द्राक्ष बागेतून लोखंडी 'वाय अॅगल' (Y-Angle) चोरी करणाऱ्या आंतर-गाव चोरांच्या टोळीला जेरबंद केले आहे.
या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ३० लाख ३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये ३ सराईत आरोपींसह एका बालअपचाऱ्याचा समावेश आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी
तासगाव तालुक्यातील पळशी (ता. खानापूर) येथील प्रवीण भीमराव पाटील यांच्या मालकीची जरंडी येथील शेतजमीनीत द्राक्ष बाग आहे. १८ जून २०२६ रोजी रात्री १० वाजण्यापूर्वी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातून द्राक्ष बागेसाठी उभारणीकरिता असलेले १ इंच व दीड इंची आकाराचे ५०९ लोखंडी 'वाय अॅगल' चोरून नेले होते. या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिेतेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची गोपनीय चक्रे आणि सापळा
वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे कडक आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांचे एक पथक तयार करण्यात आले होते.
या पथकातील पोलीस अंमलदार सोमनाथ गुंडे आणि अभिजीत ठाणेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी प्रशांत उर्फ प्रकाश शिंदे हा त्याच्या महिंद्रा पिकअप गाडीतून आणि इतर साथीदारांसह चोरी केलेले लोखंडी 'वाय अॅगल' विक्रीसाठी एका टाटा ट्रकमधून बेद्री चौक, तासगाव येथे येणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पोहेकॉ सोमनाथ गुंडे, अभिजीत ठाणेकर व पथकाने तात्काळ बेद्री चौक, तासगाव परिसरात सापळा रचला. यावेळी एक महिंद्रा पिकअप आणि ट्रक थांबल्यानंतर त्यातून खाली उतरलेल्या संशयितांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी
१. प्रशांत बाळासो शिंदे (वय ३१, रा. जोतिबानगर, भिवघाट रोड, तासगाव)
२. सुयश काकासो जाधव (वय २३, रा. पळशी, ता. खानापूर, जि. सांगली)
३. अविकुमार विश्वास मलमे (वय ३०, रा. नागाव निमणी, ता. तासगाव, जि. सांगली)
४. एक बालअपचारी
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण किंमत: ₹ ३०,०३,६००/-)
५०९ लोखंडी 'वाय अॅगल': २,०३,६०० रुपये किमतीचे (अंदाजे ४०० रुपये प्रति नग दराने).
महिंद्रा पिकअप चारचाकी वाहन: ८,००,००० रुपये किंमत.
टाटा कंपनीचा सहा चाकी ट्रक: २०,००,००० रुपये किंमत.
पुढील तपास सुरू
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, सपोफौ अमित परिट, संजय पाटील, पोहेकॉ सूर्यकांत साळुंखे, अतुल माने, हणमंत लोहार, सोमनाथ गुंडे, प्रकाश पाटील, पोलीस अंमलदार सुनील जाधव, अभिजीत ठाणेकर, विजय पाटणकर आणि सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने पार पाडली.जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आणि आरोपींना पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून, या टोळीने इतर कुठे अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का, याचा कसून तपास तासगाव पोलीस करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.