सांगलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ: १८ हजार कोटींची उलाढाल असलेली जिल्हा बँक विश्वजीत कदमांच्या ताब्यात
सांगली :- सुमारे १८ हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताकेंद्रावर आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे महेंद्र लाड, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीमुळे तब्बल २७ वर्षांनंतर जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा काँग्रेसचा अध्यक्ष विराजमान झाला असून, गेली २० वर्षे बँकेवर असलेले जयंत पाटील यांचे वर्चस्व संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. या निवड प्रक्रियेवेळी आमदार गोपीचंद पडळकर गैरहजर राहिले.
२७ वर्षांनंतर काँग्रेसकडे अध्यक्षपद
यापूर्वी सन १९९८-१९९९ मध्ये माणिकआबा पाटील (तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते) हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यानंतर तब्बल २७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महेंद्र लाड यांच्या रूपाने काँग्रेसला पुन्हा अध्यक्षपद मिळाले आहे.
विश्वजीत कदमांची राजकीय मुत्सद्देगिरी आणि कमबॅक
पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे एकमेव आमदार असतानाही डॉ. विश्वजीत कदम यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आपली पकड अधिक घट्ट केली आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचा उपाध्यक्ष, महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद आणि आता थेट जिल्हा बँक ताब्यात घेऊन त्यांनी आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, 'गोकुळ'मधील पराभवाचा डाग पुसून काढण्यात आमदार विश्वजीत कदम यांना या निवडीमुळे मोठे यश आले आहे.
शेतकरीभिमुख कारभार आणि काटकसरीचे धोरण आ. विश्वजीत कदम या निवडीनंतर बोलताना आमदार विश्वजीत कदम यांनी बँकेच्या आगामी धोरणांची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले की, "जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असून, त्यांना जास्तीत जास्त दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. बँकेचा कारभार पूर्णपणे शेतकरीभिमुख करण्यावर आमचा भर असेल. तसेच, शेतकऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि स्वयंरोजगारासाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्याच्या धोरणाचाही गांभीर्याने विचार केला जाईल."
पुढे बोलताना त्यांनी सावधगिरीचा इशाराही दिला. "यंदा जिल्ह्यात दुष्काळ असल्यामुळे कर्ज वसुलीवर गंभीर परिणाम होणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेता बँक अत्यंत काटकसरीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालवावी लागेल," असे मत आ. कदम यांनी व्यक्त केले.
सर्वांना सोबत घेऊन काम करणार : महेंद्र लाड
नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्र लाड यांनी निवडीनंतर सर्वांचे आभार मानले. "बँकेच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व संचालक मंडळ व नेत्यांना सोबत घेऊन पारदर्शक कारभार करणार," अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.