🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​पुणे पोलीस आयुक्तांना थेट कोर्टात पाचारण; मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर पोलीस दलात मोठ्या फेरबदलांचे वारे!

​पुणे पोलीस आयुक्तांना थेट कोर्टात पाचारण; मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर पोलीस दलात मोठ्या फेरबदलांचे वारे!


पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याच्या घटनेची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेनंतर न्यायालय परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना न्यायालयात बोलावण्यात आले आहे.

पुणे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे या पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार आहेत. न्यायालयाच्या परिसरात घडलेल्या या गंभीर प्रकारानंतर सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. 



यावेळी न्यायालयाच्या आतील परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा आणि मेटल डिटेक्टर तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. काल शिवाजीनगर सत्र न्यायालय परिसरात झालेल्या भीषण हल्ल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती तसेच न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत ही चर्चा करण्यात आली.

न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

मंदार किवळे यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्यानंतर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. न्यायालयात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने तपासणी केली जात आहे. तसेच, व्यक्तींसोबत असलेल्या वस्तूंचीही कसून तपासणी केली जात आहे. वकिलांसह त्यांच्यासोबत येणाऱ्या व्यक्तींनाही या तपासणी प्रक्रियेतून जावे लागत आहे.



दरम्यान, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे स्वतः जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात दाखल झाले आहेत. परिसरातील सुरक्षेचा आढावा घेण्यासोबतच कोयता हल्ला झालेल्या घटनास्थळालाही ते भेट देणार आहेत. सध्या न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून, प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.

मुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील गुन्हेगारीचा आढावा

दुसरीकडे, पुण्यातील गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची माहिती घेतली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची बाब समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वाढत्या गुन्हेगारीमागील नेमकी कारणे काय आहेत, याबाबत त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे विचारणा केली आहे.



पुण्यात सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. या परिस्थितीमुळे पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. न्यायालय परिसरातील हल्ल्याची न्यायालयाने घेतलेली दखल, वाढवण्यात आलेली सुरक्षा आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आढावा यामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.