🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घटस्फोटासाठी तब्बल २० लाखांची खंडणी! सुनेच्या छळाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या; सांगली हादरली

घटस्फोटासाठी तब्बल २० लाखांची खंडणी! सुनेच्या छळाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या; सांगली हादरली


ईश्वरपूर : ईश्वरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पहिल्या विवाहाची माहिती लपवून ठेवली. मुलासोबत घटस्फोट घेण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी करताना वारंवार त्रास दिल्याने, तसेच बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने ६३ वर्षीय वृद्ध सासऱ्याने विषारी तणनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.



याप्रकरणी तिघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिक्षक ऋषिकेश विश्वास फाटक (वय ३२, रा. पलूस, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संजना अविनाश पवार (वय १९) व अविनाश ज्ञानदेव पवार (वय ४५, दोघे रा. तुपारी, ता. पलूस) आणि स्नेहल प्रवीण गलांडे (वय ३३, रा. पलूस) अशा तिघांवर सदोष वधाचा गुन्हा नोंद आहे. 



जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत फाटक कुटुंबाला पलूस, सांगली, बुर्ली आणि मसुचीवाडी येथे वारंवार त्रास देण्यात आला होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजना अविनाश पवार हिचा पहिला विवाह झाला होता. मात्र, ही बाब फिर्यादी ऋषिकेश व त्यांच्या कुटुंबापासून लपवली. त्यानंतर ऋषिकेशसोबत नांदण्यासाठी येण्यास नकार देत व घटस्फोट घेण्यासाठी तब्बल २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.

 तसेच बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या कुटुंबाला सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता. या सततच्या त्रासाला व दबावाला कंटाळून ऋषिकेश यांचे वडील विश्वनाथ नाना फाटक (वय ६३, सध्या रा. पलूस, मूळ रा. मसूचीवाडी) यांनी २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आपल्या शेतात विषारी तणनाशक प्राशन केले. त्यांना तात्काळ उपचारासाठी सांगलीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान २२ ऑक्टोबरला रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 




घटस्फोटाच्या मागणीवरून वाद पहिल्या विवाहाची माहिती लपवल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. घटस्फोटासाठी २० लाख रुपयांची मागणी आणि खोट्या बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी दिल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.