सांगली : पाईपद्वारे स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी घेतलेल्या १७०० ग्राहकांचा सिलिंडर पुरवठा कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. शासनाच्या धोरणानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. आणखी सुमारे ४००० कुटुंबांची सिलिंडर गॅस कनेक्शन्स लवकरच बंद होण्याची शक्यता आहे.
पाईपद्वारे गॅस घेतलेल्या कुटुंबांचा सिलिंडर पुरवठा बंद करण्याचा निर्णय शासनानेच घेतला आहे. त्यानुसार कार्यवाहीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी वेळोवेळी बैठकांमध्ये दिले होते. त्याची अंमलबजावणी जिल्हा पुरवठा विभागाकडून सुरू आहे.
सध्या सांगली, मिरज, कुपवाड शहरांमध्ये भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीकडून पाईपद्वारे गॅस जोडण्या देण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. सांगली शहरात सुमारे सहा हजार कुटुंबांना गॅस पुरवठा कार्यान्वित करण्यात आला आहे. मिरज शहरात गेल्या आठवड्यात पुरवठ्याचा प्रारंभ करण्यात आला.
आठवडाभरात सुमारे सव्वाशे कुटुंबांच्या जोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या. महिनाभरात सुमारे एक हजार कुटुंबांना पाईपद्वारे गॅस सुरू करण्याचे भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे नियोजन आहे. त्याचबरोबर हॉटेल्स, उद्योग, व्यावसायिक यांनाही पाईपद्वारे गॅस देण्यात येणार आहे. पाईपद्वारे गॅस मिळाल्याने या कुटुंबांना सिलिंडरची आवश्यकता राहणार नाही, असे शासनाचे म्हणणे आहे.
त्यामुळेच त्यांचा सिलिंडर पुरवठा बंद करण्यात येत आहे. पाईपद्वारे गॅस जोडण्या कार्यान्वित झालेल्या कुटुंबांची यादी पुरवठा शाखेने मागवून घेतली आहे. त्यांचा सिलिंडर पुरवठा टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात १७०० कुटुंबांचा एलपीजी सिलिंडर पुरवठा कायमस्वरूपी बंद करण्यात आला. पुढील टप्प्यात उर्वरित सहा हजार कुटुंबांचा सिलिंडर पुरवठा बंद करण्यात येणार आहे.ईश्वरपूर, आष्ट्यातही होणार कार्यवाही ईश्वरपूर, आष्टा येथेही पाईपद्वारे घरोघरी गॅस पुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे तेथील कुटुंबांचा सिलिंडर पुरवठाही बंद केला जाणार आहे. सिलिंडरद्वारे गॅस पुरवठ्यामुळे शासनावर मोठा आर्थिक ताण येतो. घरगुती सिलिंडरसाठी अनुदान द्यावे लागते. हा भार कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
पाईपद्वारे मिळणारा गॅस सिलिंडरमधील एलपीजीच्या तुलनेत स्वस्त आणि अत्यंत सुरक्षित आहे. अपघातांचा धोका अजिबात राहत नाही. त्यामुळे पाईपद्वारे गॅसला ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. पाईपद्वारे २४ तास गॅस उपलब्ध राहणार असल्याने त्यांना सिलिंडर वापराची गरज राहणार नाही. - विशाल कुरणे, अभियंता, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.