पालकमंत्र्यांनाच दिला ‘डुल’? सांगलीत महापौरांच्या वाढदिवस डिजिटलवरून भाजपचे बडे नेते ‘गायब’; पक्षांतर्गत वादाची तुफान चर्चा!
सांगली :- सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या उद्या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शहरभरात झळकलेल्या डिजिटल बॅनर्समुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे.
या डिजिटल फलकांवरून जिल्ह्याचे पालकमंत्री, भाजपचे मुख्य नेते आणि पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे गायब असल्याने सांगली भाजपमध्ये जोरदार उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
काय आहे नेमका प्रकार?
महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या समर्थक, कार्यकर्ते आणि निष्ठावंतांनी शहरात विविध ठिकाणी भव्य डिजिटल बॅनर्स उभारले आहेत. मात्र, या डिजिटल फलकांवर भाजपच्या स्थानिक आणि जिल्हास्तरीय बड्या नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही. थेट पालकमंत्र्यांचेच छायाचित्र फलकांवरून वगळण्यात आल्याने सर्वसामान्यांसह राजकीय गोटातही भुवया उंचावल्या आहेत.
पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर?
गेल्या काही काळापासून सांगली महापालिका आणि भाजपच्या स्थानिक गटातटाच्या राजकारणात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची चर्चा होती. आता थेट महापौरांच्या वाढदिवसाच्या डिजिटलवरूनच भाजप नेत्यांची 'मायनस' हजेरी पाहायला मिळाल्याने पक्षातील मतभेद आणि गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
नेत्यांना डावलले की जाणीवपूर्वक दुर्लक्ष? महापौरांच्या कार्यकर्त्यांनी हे डिजिटल बॅनर्स तयार करताना स्थानिक नेत्यांना जाणीवपूर्वक डावलले आहे की अंतर्गत नाराजीतून हा प्रकार घडला, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
विरोधी गोटात चर्चा: या प्रकारामुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले असून, "भाजपमधील अंतर्गत ऑल इज नॉट वेल" अशा चर्चांना उधाण आले आहे.
नेत्यांची भूमिका काय? या डिजिटल नाट्यावर स्वतः महापौर धीरज सूर्यवंशी किंवा भाजपचे इतर वरिष्ठ नेते काय स्पष्टीकरण देतात, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.वाढदिवसाच्या या डिजिटल वारामुळे सांगलीतील राजकीय तापमान चांगलेच तापले असून, आगामी काळात याचे पडसाद महापालिकेच्या राजकारणात कसे उमटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.