सांगली :- वाढत्या डिजिटल युगात महिलांच्या सुरक्षेचा आणि गोपनीयतेचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीच्या सुपुत्रा व सांगली जिल्हा न्यायालयात वकिली करणाऱ्या अॅड. अस्मिता बाबासाहेब कवठेकर यांनी महिलांच्या सायबर सुरक्षेवर अतिशय मोलाचे संशोधन पूर्ण केले आहे. त्यांच्या या संशोधनाची दखल घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून त्यांना डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी बहाल करण्यात आली आहे.
अॅड. अस्मिता कवठेकर यांनी पुण्यातील नामांकित 'आयएलएस लॉ कॉलेज' (ILS Law College) येथील संशोधन केंद्रातून आपला हा शोधप्रबंध सादर केला. "सायबर क्राईम इन द कॉन्टेक्स्ट ऑफ व्हायोलेशन ऑफ राईट ऑफ डिग्निटी, प्रायव्हसी अँड कॉन्फिडेन्शियालिटी ऑफ वुमन - लॉ अँड POLICY इन इंडिया" (महिलांच्या प्रतिष्ठा, गोपनीयता आणि गुप्ततेच्या अधिकारांच्या उल्लंघनाच्या संदर्भात सायबर गुन्हे - भारतातील कायदा आणि धोरण) हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय होता. यासाठी त्यांना आयएलएस लॉ कॉलेजच्या प्रा. डॉ. दीपा पातूरकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
कायद्यातील त्रुटी आणि प्रभावी धोरणांवर भर
सध्याच्या आधुनिक युगात सोशल मीडिया व डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढत असताना महिलांच्या वैयक्तिक गोपनीयतेला आणि प्रतिष्ठेला कसा गंभीर धोका निर्माण होत आहे, याचे सखोल विश्लेषण अॅड. कवठेकर यांनी आपल्या प्रबंधात केले आहे.
या सायबर गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी आणि महिलांना कायद्याचे भक्कम संरक्षण मिळवून देण्यासाठी भारतातील सध्याचे कायदे व शासकीय धोरणे अधिक प्रभावी कशी करता येतील, याबाबत त्यांनी महत्त्वाच्या शिफारसी व उपाययोजना मांडल्या आहेत.
सामाजिक व कायदेशीर क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
अॅड. अस्मिता कवठेकर यांनी यापूर्वी सांगली बार असोसिएशनच्या 'सह सचिव (महिला)' म्हणून अत्यंत यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे.
वकिली व्यवसायात कार्यरत असतानाच त्यांनी कायदेशीर संशोधनाच्या क्षेत्रात मिळवलेल्या या उत्तुंग यशामुळे सांगली जिल्ह्याच्या व सनदी वकील वर्गाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विधि क्षेत्रासह विविध सामाजिक व राजकीय स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.