'देवदूत' की 'काळ'? निष्काळजीपणामुळे इस्माईल दरबार यांच्या आईचा बळी; दोषी डॉक्टरला कोर्टाचा दणका, २ वर्षांची सक्तमजुरी
सुरत: रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या 70 वर्षीय वृद्धेच्या पाठीखाली गरम पाण्याची पिशवी (हॉट वॉटर बॅग) रात्रभर तशीच राहिली आणि त्यातून झालेली गंभीर जखम मृत्यूस कारणीभूत ठरली, तर याला अपघात म्हणायचं की अक्षम्य निष्काळजीपणा?
तब्बल 17 वर्षे चाललेल्या प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर सुरत जिल्हा न्यायालयाने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबार यांच्या आई जैतून बीबी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी न्यायालयाने डॉ. परेश भजियावाला यांना वैद्यकीय निष्काळजीपणाप्रकरणी दोषी ठरवत 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 2009 मधील या गाजलेल्या प्रकरणात आलेल्या निकालामुळे केवळ दरबार कुटुंबालाच दिलासा मिळालेला नाही, तर वैद्यकीय क्षेत्रातही या निर्णयाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
जानेवारी 2009 मधील 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
ही दुर्दैवी घटना जानेवारी 2009 मध्ये सुरत येथील 'गिरीश ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स' मध्ये घडली होती. इस्माईल दरबार यांच्या 70 वर्षीय आई जैतून बीबी यांना ताप आणि इतर आजारांच्या तक्रारीमुळे या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांच्या पाठीत दुखू लागल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शेक देण्यासाठी त्यांच्या पाठीवर गरम पाण्याची पिशवी ठेवली. मात्र, रुग्णालय प्रशासन आणि संबंधित डॉक्टरांच्या गंभीर निष्काळजीपणामुळे ही गरम पाण्याची पिशवी रात्रभर त्यांच्या शरीराखालीच दबलेली राहिली.
तक्रारदार आणि सरकारी पक्षाचे वकील केतन रेशमवाला यांनी न्यायालयापुढे सादर केलेल्या
माहितीनुसार, रात्रभर गरम पिशवीच्या संपर्कात राहिल्याने जैतून बीबी यांची पाठ मोठ्या प्रमाणावर भाजली आणि पाठीवर खोल जखम झाली. या गंभीर दुखापतीमुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमालीची खालावली. त्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने बिघडत गेली; त्या पुन्हा कधीही अंथरुणातून उठू शकल्या नाहीत आणि अखेर 11 फेब्रुवारी 2009 रोजी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
16 हून अधिक साक्षीदार अन् सहआरोपी नर्स अद्याप फरार
आईच्या मृत्यूनंतर इस्माईल दरबार यांनी रुग्णालय प्रशासनाच्या या घोर निष्काळजीपणाविरोधात आवाज उठवत कायदेशीर लढाई सुरू केली. सुरुवातीला डॉ. परेश भजियावाला, नर्स चंचूबेन आणि रुग्णालयातील जबाबदार डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तपासानंतर पोलिसांनी रुग्णालयात कार्यरत असलेल्या एमबीबीएस पदवीधारक डॉ. परेश भजियावाला आणि नर्स चंचूबेन या दोघांविरुद्धच आरोपपत्र दाखल केलं.
पोलिसांनी दोघांनाही अटक केल्यानंतर खटल्याची सुनावणी सुरू झाली. दरम्यानच्या काळात नर्स चंचूबेन जामिनावर बाहेर आल्या, परंतु सुनावणी सुरू असतानाच त्या पसार झाल्या; सध्या न्यायालयाने त्यांना 'फरार' घोषित केलं आहे. दुसरीकडे, डॉ. परेश भजियावाला यांच्याविरोधातील खटला सुरू राहिला. या प्रदीर्घ सुनावणीदरम्यान वकील केतन रेशमवाला यांच्या नेतृत्वाखाली अभियोजन पक्षाने 16 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि त्यांची उलटतपासणी घेतली. यामध्ये इस्माईल दरबार यांच्या कुटुंबीयांसह उपचारांशी संबंधित तज्ज्ञ डॉक्टर, इतर उपचार करणारे डॉक्टर आणि शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या साक्षींचा समावेश होता.
वैद्यकीय क्षेत्रासाठी इशारा देणारा निकाल
सर्व पुरावे आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या साक्षी तपासल्यानंतर न्यायालयाने डॉ. भजियावाला यांचा वैद्यकीय निष्काळजीपणा स्पष्टपणे सिद्ध झाल्याचं मानत त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली. या निकालावर प्रतिक्रिया देताना वकील केतन रेशमवाला म्हणाले की, "हा निकाल यायला 17 वर्षे लागली असली, तरी तो पूर्णपणे योग्य आहे आणि यातून एक मोठा आदर्श निर्माण होईल." उपचारादरम्यान दाखवलेला थोडासा निष्काळजीपणाही एखाद्याच्या जीवावर कसा बेतू शकतो आणि त्याचे कायदेशीर परिणाम किती गंभीर असू शकतात, हेच या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.