सुप्रीम कोर्टाचा रुद्रावतार: "अधिकाऱ्यांवर खटल्याची परवानगी द्या, नाहीतर CMD ना कोर्टात बोलावू!" ४ बड्या बँकांना ७ दिवसांची मुदत
बिल्डरांची मनमानी आणि बँकांकडून होणाऱ्या कर्जवसुलीमुळे अडचणीत सापडलेल्या हजारो घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. होम लोन सबवेंशन योजनेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने HDFC बँक आणि ICICI बँकेसह चार प्रमुख वित्तीय संस्थांना त्यांच्या आरोपित अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी सात दिवसांच्या आत बिनशर्त मंजुरी देण्याचे निर्देश दिले आहेत.
मंजुरी देण्यास विलंब केल्यास किंवा त्यासाठी कोणतीही अट घातल्यास संबंधित बँकांचे व्यवस्थापकीय संचालक (CMD) आणि अध्यक्ष यांना थेट न्यायालयात हजर राहावे लागेल, असा स्पष्ट इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, संबंधित सर्व बँका आणि वित्तीय संस्थांनी एका आठवड्याच्या आत खटला चालवण्यासाठी बिनशर्त मंजुरी द्यावी. तसे न केल्यास त्यांच्या CMD आणि अध्यक्षांना न्यायालयात उपस्थित राहून त्यांच्याविरोधात योग्य कारवाई का करण्यात येऊ नये, याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण होम लोनच्या ‘सबवेंशन स्कीम’शी संबंधित आहे. या योजनेची जाहिरात ‘नो EMI टिल पझेशन’, म्हणजेच घराचा ताबा मिळेपर्यंत कर्जाचा हप्ता भरण्याची गरज नाही, अशा स्वरूपात केली जात होती. या योजनेत घर खरेदीदार, बिल्डर आणि बँक यांच्यात त्रिपक्षीय करार केला जात असे. करारानुसार, बांधकामाच्या प्रगतीनुसार बँकेने बिल्डरला कर्जाची रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित करणे अपेक्षित होते.
मात्र, आरोपांनुसार काही बँक अधिकाऱ्यांनी बिल्डरांशी संगनमत करून बांधकाम सुरू होण्यापूर्वीच कर्जाची संपूर्ण रक्कम एकाच वेळी बिल्डरांच्या खात्यात जमा केली. घराचा ताबा मिळेपर्यंत कर्जाचे हप्ते बिल्डरने भरायचे, अशी करारात अट होती. मात्र, कर्जाची रक्कम मिळाल्यानंतर अनेक बिल्डरांनी प्रकल्प अर्धवट सोडले आणि बँकेचे हप्ते भरणेही बंद केले. त्यानंतर संबंधित बिल्डरांवर कारवाई करण्याऐवजी बँकांनी घर खरेदीदारांकडे कर्जफेडीसाठी तगादा लावल्याचा आरोप आहे. यामुळे घराचा ताबा मिळालेला नसतानाही हजारो ग्राहकांवर कर्जफेडीचा बोजा पडला. त्याचबरोबर कर्जाचे हप्ते थकल्याने त्यांच्या सिबिल स्कोअरवरही परिणाम झाला.
CBI कडून ५५ गुन्हे दाखल; २२ प्रकरणांत आरोपपत्र
बँकांच्या वसुलीच्या दबावामुळे त्रस्त झालेल्या दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बंगळुरूसह देशातील विविध भागांतील घर खरेदीदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने बिल्डर आणि बँकांमधील कथित संगनमताची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवली.
CBI च्या तपासात काही बँक अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करून आणि प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी पडताळणी न करताच बिल्डरांना शेकडो कोटी रुपयांचे कर्ज वितरित केल्याचे समोर आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात CBI ने देशभरात एकूण ५५ गुन्हे दाखल केले. त्यापैकी २५ प्रकरणांचा तपास पूर्ण करण्यात आला असून, २२ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अर्धवट राहिलेल्या बांधकाम प्रकल्पांमध्ये अडकलेल्या घर खरेदीदारांकडून बँकांनी जबरदस्तीने EMI वसूल करू नयेत आणि त्यांच्याविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले होते.
बँकांना सात दिवसांचा अल्टिमेटम
CBI ने तपासाची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिल्यानंतर न्यायालयाने संबंधित बँका आणि वित्तीय संस्थांना सात दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत आरोपित अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी बिनशर्त मंजुरी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीत मंजुरी न दिल्यास संबंधित चारही वित्तीय संस्थांचे CMD आणि अध्यक्ष यांना स्वतः न्यायालयात हजर राहून स्पष्टीकरण द्यावे लागेल. त्यामुळे या प्रकरणात आता बँकांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.