"जरांगे पाटील सुपारी घेऊन काम करतात!" – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा थेट आरोप; SIT चौकशीतून सत्य बाहेर येणार?
मराठा आरक्षण चळवळीचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी २२ ऑक्टोबर रोजी एक ऑडिओ क्लिपचा बॉम्ब टाकला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.
मनोज जरांगे पाटलांना बदनाम कसं करायचं, त्यांच्याविरोधातल्या लोकांना कशा पद्धतीने विकत घ्यायचं; असा संवाद त्या क्लिपमध्ये होता. ती बैठक भाजपची असल्याचा दावा केला जातोय. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक स्थापन केलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप सादर करण्यापूर्वीच रामदास कदम यांच्याकडे ती क्लिप आली होती आणि ती त्यांनी माध्यमांमधून ऐकवलीदेखील होती. त्यामुळे जरांगे पाटलांनी रामदास कदम यांचीही चौकशी करण्याची मागणी केलीय. त्यामुळे ती क्लिप आली कुठून हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.
याच मुद्द्यावरुन राज्याचे गृहराज्यमंत्री आणि रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी मनोज जरांगे पाटलांवर गंभीर स्वरुपाची टीका केली आहे. ते अहिल्यानगर येथे माध्यमांशी बोलत होते. मंत्री कदम म्हणाले की, मनोज जरांगे पाटील हे आता पूर्णपणे कुणाचीतरी सुपारी घेऊन काम करीत आहेत. मी आधीही हे म्हटलेलं होतं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना आणि आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनीही मराठा समाजासाठी मोठे निर्णय घेतले. तेवढे निर्णय आजवर कोणीही घेतलेले नव्हते.
योगेश कदम पुढे म्हणाले, मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं, उठाव केला त्याला सरकारने तितकाच सकारात्मक प्रतिसादही दिला. मात्र आता त्यांची दिशा भरकटली आहे. एकनाथ शिंदे यांच्यावरती ते चुकीच्या पद्धतीने आरोप करीत आहेत. त्यात ते यशस्वी होऊ शकत नाहीत. आता मला त्यांचा उद्देश मराठा समाजाच्या हिताचा दिसून येत नाही.
''एसआयटी चौकशी सुरु आहे. चौकशीनंतर सगळ्याच बाबी समोर येणार आहेत. त्यांना जिथून ती ऑडिओ क्लिप मिळाली, त्याबाबतची माहिती लपून राहणार नाही.'' असंही योगेश कदम यांनी माध्यमांना सांगितलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.