🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निवडणूक आयोगाला मोठा धक्का! २ कोटींच्या लाचप्रकरणात इंजिनिअरचा बळी; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार अडचणीत!

निवडणूक आयोगाला मोठा धक्का! २ कोटींच्या लाचप्रकरणात इंजिनिअरचा बळी; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार अडचणीत!


भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. २० वर्षांपूर्वी केरळमधील रस्त्याच्या बांधकाम प्रकल्पादरम्यान २ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी दिले आहेत. 


याप्रकरणी विधी खात्याचा सल्ला घेतल्यानंतर गृह मंत्रालयाने चौकशीला परवानगी दिली. ज्ञानेश कुमार हे केरळ केडरचे सनदी अधिकारी असून, त्यावेळी ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव म्हणून काम करत होते.

काय आहे २० वर्षे जुने प्रकरण?

कोल्लम जिल्ह्यातील चडयमंगलमचे कंत्राटदार साजन यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. कंत्राटदार साजन यांच्या माहितीनुसार, इंजिनिअर्सनी सुमारे १७ कोटी रुपयांचे बिल पास केले होते. पण, तेव्हाचे पीडब्ल्यूडी सचिव ज्ञानेश कुमार यांनी २ कोटी रुपयांची लाच मागितली आणि कामाचे पैसे अडकवून ठेवले. 




कंपनीच्या वरिष्ठांनी मात्र लाच देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे कंपनीचे मलेशियन इंजिनिअर ली सी बीन खूप अडचणीत आले. त्यांनी कंत्राटदार आणि कामगारांचे पैसे देण्यासाठी बंगळुरूमधील दुसऱ्या कामाचे पैसे वापरले. पण पैसे न मिळाल्याने आणि लाचेच्या त्रासाला कंटाळून त्यांनी २००६ मध्ये आत्महत्या केली.

ली सी बीन यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ज्ञानेश कुमार यांच्या नावाचा थेट उल्लेख केला होता, असा दावा साजन यांनी केला. ली यांच्या मलेशियातील कुटुंबानेही कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली होती.

जुन्या तपासावर प्रश्नचिन्ह आणि नवी चौकशी

ली सी बीन यांच्या मृत्यूनंतर २००६ मध्येही या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाली होती. मात्र, पुरावे सिद्ध न झाल्याचे सांगून ती चौकशी बंद करण्यात आली होती. साजन यांनी आरोप केला की, पूर्वीच्या तपासात साक्षीदारांची आणि ली यांच्या कुटुंबीयांची कसून चौकशीच करण्यात आली नव्हती. 




आता गरज पडल्यास ली यांचे कुटुंब, कंपनीचे माजी कर्मचारी आणि इतर साक्षीदारांना पुराव्यासहित हजर करण्याची तयारी साजन यांनी दर्शवली आहे.

यापूर्वी ४ ऑक्टोबर रोजी केपीसीसी नेते मलयिं कीळू वेणुगोपाल यांच्या तक्रारीवरूनही गृहमंत्र्यांनी केएसटीसी चौकशीचे आदेश दिले होते. आता या नव्या तक्रारीचाही समावेश त्याच चौकशीत केला जाईल. ही चौकशी अशा वेळी सुरू झाली आहे, जेव्हा देशभरात इंडिया आघाडी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. एसआयआर मोहिमेत मोठा घोळ असल्याचा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी सातत्याने करत आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर किंवा आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.