'कैसा हराया' या विधानामुळे थेट चर्चेत आलेल्या AIMIM च्या नगरसेविका सहार शेख आता नव्या वादात सापडल्या आहेत. याचं कारण आहे औरंगजेबाचं कौतुक.
सहार शेख या तरूण नगरसेविकेने एक पोस्ट केली आहे. यात तिने औरंगजेबाचं कौतुक करत इतिहास कसा पुसता येईल असं म्हणत औरंगजेबाची महती सांगतली आहे. त्यामुळे सहार शेखला ट्रोल केलं जातं आहे. काय आहे प्रकरण आपण जाणून घेऊ.
सहार शेखने पोस्ट करत काय म्हटलं आहे?
अत्यंत वादग्रस्त असलेल्या मुघल सम्राट औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक असा सम्राट ज्याने पूर्ण श्रद्धेने आणि शक्तीने मलिक उल हिंद वर राज्य केलं. पण लक्षात ठेवा इतिहास कधीही पुसता येत नाही असं सहार शेखने म्हटलं आहे. तसंच एका फोटोत सिंह आणि औरंगजेब यांचा फोटो एकत्र करत औरंगजेबाचं महत्त्व पुसणारे कितीही प्रपोगंडा चित्रपट तयार करा.
औरंगजेबाची कितीही बदनामी करा काही फरक पडणार नाही. असं सहार शेखने म्हटलं आहे. त्यानंर हुमायुनच्या कबरीच्या बाहेर एक फोटो पोस्ट केला आहे आणि प्रश्न विचारला आहे की माझ्या मागे हुमायूनची कबर आहे. कधी विचार केला आहे का? की कबर अशी बांधत असतील तर देश कसा चालवत असतील? त्याचप्रमाणे मुघल काळातल्या इतरही पोस्ट तिने केल्या आहेत.
ताजमहालाचा फोटो पोस्ट करत काय म्हटलंय?
सहार शेख यांनी ताजमहालाचा फोटो पोस्ट केला आहे आणि म्हटलं आहे की मुघलांनी ताजमहाल बांधला आणि जगातल्या सात आश्चर्यांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. आणखी एक फोटो पोस्ट करत म्हटलंय गंमत काय माहीत आहे का? त्यांना इतिहासातून मुघलांना बाहेर काढायचं आहे. पुस्तकांतून मुघलांना बाहेर काढू शकतात पण या जमिनीवरून कसं बाहेर काढाल? असा प्रश्न सहार शेखने उपस्थित केला आहे. इनशाँ अल्लाह मुघलिया सल्तनत का इकबाल हमेशा बुलंद रहे असंही सहार शेखने म्हटलं आहे. ज्यावरून वाद सुरू झाला आहे. सहार शेख यांनी केलेल्या पोस्टला ३० हजारांहून अधिक लाईक्स आल्या आहेत. या पोस्टच्या कमेंट सहार शेखने बंद केल्या आहेत.
मात्र ट्वीटरवर या पोस्टचे स्क्रीन शॉट पोस्ट करून सहार शेख यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात राहून औरंगजेबाचं गुणगान कसं काय मान्य होतं आहे? त्याचा वाढदिवस साजरा करणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं एका युजरने म्हटलं आहे. आणखी एका युजरने म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो औरंगजेबाच्या नाही. महाराष्ट्रात हे काय चाललं आहे? महाराष्ट्राच्या इतिहासाचा सहार शेख यांनी अपमान केला आहे. आणखी एका युजरने म्हटलं आहे की सहार शेख या ठाणे महापालिकेत नगरसेविका आहेत. त्या औरंगजेबाचं कौतुक कसं करतात? औरंगजेबाचा वाढदिवस छत्रपती शिवरायांच्या भूमित कसा साजरा होऊ शकतो? हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशा प्रतिक्रिया एक्सवर येत आहेत आणि वाद निर्माण झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.