🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"मला माझं बाळ हवंय!" हरवलेल्या पोपटासाठी तब्बल १ लाखाचं बक्षीस; बडोद्यातील हा लाडका पोपट इतका खास का?

"मला माझं बाळ हवंय!" हरवलेल्या पोपटासाठी तब्बल १ लाखाचं बक्षीस; बडोद्यातील हा लाडका पोपट इतका खास का?


माणसाचं प्राण्यांवर आणि पक्षांवर असलेलं प्रेम कोणत्या थराला जाऊ शकतं, याचं एक उदाहरण गुजरातच्या बडोदा शहरात पाहायला मिळालं आहे. येथील सेवासी भागात राहणाऱ्या जेसिका पारेख यांचा ६ महिन्यांचा ‘लड्डू’ नावाचा ‘काँगो आफ्रिकन ग्रे’ (African Grey Parrot) प्रजातीचा पोपट पिंजऱ्याची कडी स्वतः उघडून घरातून उडून गेला.

आपल्या एका बाळासारख्या असलेल्या या पोपटाला शोधून देणाऱ्या व्यक्तीला जेसिका यांनी तब्बल १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. वन विभाग, स्थानिक बचाव दल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या लड्डूचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.




इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, जेसिका म्हणाल्या, “संध्याकाळी साधारण ७.२४ वाजता डिलिव्हरी बॉय आला होता. मी पिंजऱ्यातून लड्डूला खाऊ घालत होते आणि पार्सल घेण्यासाठी थोडा वेळ बाहेर पडले. लड्डू पिंजऱ्यातच होता, पण त्याला पिंजऱ्याची कडी उघडता येत होती. मला काही कळण्याआधीच त्याने कडी उघडली आणि मुख्य दरवाजातून थेट बाहेर उडून गेला.”

जेसिका यांनी सोशल मीडियावर केली पोस्ट

जेसिका यांनी त्यांचे शेजारी, वन विभाग आणि इतर प्राणी-पक्षी बचाव दलांशी संपर्क साधला आहे. तसेच त्यांनी या पोपटाबद्दल सोशल मीडियावरही पोस्ट केली आहे. “मी वन विभाग आणि बचाव पथकांशी संपर्क साधला. पण चार दिवस झाले काहीच पत्ता नाही, शेवटी मी सोशल मीडियाचा आधार घेतला. मला खूप पक्षीप्रेमींचे फोन आले, त्यांचे पोपट ८ ते १० दिवसांनंतर परत आले होते, असा दिलासा दिला. तसेच माझा पोपट शोधण्यास मदत करण्याचं आश्वासन वनविभागाने दिलं आहे.”




लड्डू अजून लहान असल्याने तो १५ किलोमीटरपेक्षा जास्त लांब उडून जाऊ शकत नाही, असं जेसिका सांगतात. “आमच्या घराजवळच्या एका फार्महाऊसमध्ये तो दिसल्याची माहिती मिळाली होती. पण तिथे जाऊन शोध घेऊनही तो सापडला नाही. पण परदेशी प्रजातीचे हे पक्षी जास्त लांब उडत नसल्याने तो १५ किलोमीटरच्या पलीकडे गेला नसेल, अशी मला खात्री आहे. सध्या तो कुठेतरी एकटाच लपून बसला असेल आणि घाबरला असेल. त्याला गर्दी किंवा आवाज अजिबात आवडत नाही. घरीसुद्धा तो फक्त माझ्याच जवळ म्हणजे त्याच्या मम्माच्याजवळ असायचा,” असं जेसिका म्हणाल्या.

जेसिका पोपटाबद्दल म्हणाल्या, माझं एकुलतं एक बाळ

जेसिका यांनी सोशल मीडिया पोस्टरमध्ये ‘एकुलतं एक बाळ’ म्हटलंय. तसेच लड्डूला शोधून देणाऱ्याला १ लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे खूप लोक फोन करत आहेत. काही जण तर लड्डूऐवजी दुसरा पोपट विकत घ्या असं सांगत आहेत. काही जण राखाडी रंगाच्या पोपटाचे फोटो पाठवून ऑनलाइन पैसे मागत आहेत. 


पण आपल्याकडे पोपट पाळण्याचा परवाना आहे, पोपटाला अंगठी घातलीये, त्यामुळे मी आपला पोपट ओळखू शकते असं जेसिका यांनी सांगितलं. “मी इथे कोणतीही डील करायला बसलेले नाही, मी माझ्या बाळाला शोधत आहे,” असं जेसिका यांनी सांगितलं. त्यांनी लड्डूला मुंबईहून आणलं होतं.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.