🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमेरिकेत EVM नसतानाही 'सुपरफास्ट' मतमोजणी! बॅलेट पेपरवरचा पराक्रम पाहून जग चकित; वाचा गुप्त सूत्र!

अमेरिकेत EVM नसतानाही 'सुपरफास्ट' मतमोजणी! बॅलेट पेपरवरचा पराक्रम पाहून जग चकित; वाचा गुप्त सूत्र!


अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीची मतमोजणी सुरू असून निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. आतापर्यंतच्या कलानुसार डेमॉक्रॅट्सने बहुमताचा आकडा पार केला असून ट्रम्प यांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे.



पण, अमेरिकेत मतपत्रिकांमार्फत मतदान होऊनही मतमोजणी वेगाने कशी पार पडते. अवघ्या काही तासांत १० कोटींहून अधिक मतपत्रिकांची मोजणी पार पडली आणि निकालांचे कलही समोर येऊ लागले. मग इतक्या मोठ्या प्रमाणावरील कागदी मतपत्रिकांची मोजणी इतक्या वेगाने कशी केली जाते?

बिहार विधान परिषदेच्या  निवडणुकांमधील मतमोजणीशी तुलना केली तर हा प्रश्न अधिकच महत्त्वाचा ठरतो. तिथे कागदी मतपत्रिकांवरील अवघ्या ६९,१४१ मतांची मोजणी पूर्ण होण्यासाठी एका मतदारसंघात तब्बल ५७ तास लागले होते; तर दुसरीकडे अमेरिकेच्या निवडणुकीत प्रतिनिधीगृहाच्या सर्व ४३५ जागा, सिनेटच्या ३५ जागा आणि ३६ राज्यांतील गव्हर्नरपदासाठी मतदान पार पडले. 




फ्लोरिडा विद्यापीठाच्या इलेक्शन लॅबनुसार, मतदानाच्या दिवसापूर्वीच ५.७ कोटींहून अधिक मतदारांनी मतदान केले होते, तर असोसिएटेड प्रेसच्या अंदाजानुसार, या निवडणुकीत एकूण १० कोटींहून अधिक मते पडली. एवढ्या मोठ्या संख्येने मतांची मोजणी इतक्या कमी वेळात कशी शक्य होते हे समजून घेऊया. केवळ मतपत्रिकांची संख्या कमी असल्याने मतमोजणीची प्रक्रिया वेगाने पार पडत नाही, तर त्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञानही महत्त्वाचे आहे. देशभरातील १० हजारांहून अधिक केंद्रांवर स्थानिक निवडणूक अधिकारी मतमोजणी करत आहेत. भारतात विधान परिषद निवडणुकांमध्ये मतपत्रिकांची मोजणी प्रामुख्याने हाताने केली जाते; मात्र अमेरिकेत मतपत्रिकांची इलेक्ट्रॉनिक स्कॅनर वापरून स्वयंचलितपणे मतमोजणी केली जाते.

अमेरिकेत मतदान कागदावर, पण मतमोजणी यंत्रांद्वारे

अमेरिकेतील मतदान आणि भारतातील मतदान यातील मुख्य फरक म्हणजे अमेरिकेत मतदार मतपत्रिकेवर आपली मते नोंदवतात; मात्र मतांची मोजणी यंत्रांच्या मदतीने होते, तर भारतातील निवडणुकांमध्ये ईव्हीएमवर बटण दाबून मत नोंदवले जाते. अमेरिकेत मतदार त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील गोल किंवा चौकटीत खूण करून मत नोंदवतात. त्यानंतर ही मतपत्रिका मतदान केंद्रावरील किंवा स्वतंत्र मतमोजणी केंद्रातील स्कॅनिंग मशीनमार्फत तपासली जाते. ते स्कॅनर मतपत्रिकांचे रिडिंग करतात. मोठ्या मतमोजणी केंद्रांवर ताशी हजारो मतपत्रिका तपासण्याची क्षमता असलेली वेगवान यंत्रे वापरली जातात. 

अमेरिकेच्या निवडणूक सहाय्य आयोगाने  २०२४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशातील जवळपास सर्वच निवडणूक क्षेत्रांमध्ये मतपत्रिकांद्वारे मतदान पार पडते किंवा मतदानाची कागदी नोंद तयार ठेवणारी यंत्रणा कार्यरत आहे. या प्रक्रियेत मतांची नोंद डिजिटल पद्धतीने मोजली जात असली, तरी मूळ कागदी मतपत्रिका जतन करून ठेवल्या जातात, त्यामुळे मतमोजणीवर आक्षेप आल्यास, फेरमोजणी किंवा तपासणी करायची असल्यास अधिकारी या मतपत्रिका पुन्हा तपासू शकतात.

निवडणुकीच्या दिवसाआधीच मतमोजणीची तयारी

अमेरिकेत मतमोजणी लवकर होण्यामागील आणखी एक कारण म्हणजे केवळ निवडणुकीच्या दिवशीच मतदानाची पूर्ण प्रक्रिया सुरू होत नाही. अनेक राज्यांमध्ये मतदारांना आधीच मतदान करण्याची मुभा असते. त्यासाठी ते ठरवलेल्या मतदान केंद्रांवर जाऊ शकतात किंवा टपालाद्वारे मतपत्रिका पाठवू शकतात. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ३ नोव्हेंबरच्या मध्यावधी निवडणुकीपूर्वीच ५.७ कोटींहून अधिक अमेरिकन नागरिकांनी मतदान केले होते.

आधीच मतदान पार पडत असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांना आधीच काहीशी तयारी करता येते. अमेरिकेतील नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्सच्या माहितीनुसार, ४३ राज्यांमध्ये आणि यूएस व्हर्जिन आयलंड्समध्ये टपालाने आलेल्या मतपत्रिकांची प्राथमिक प्रक्रिया मतदानाच्या दिवसाआधीच सुरू करता येते. यात मतदारांची माहिती आणि स्वाक्षऱ्या तपासणे, पाकिटे उघडणे आणि मतपत्रिका स्कॅनिंगसाठी तयार ठेवणे यांचा समावेश असतो. काही राज्यांमध्ये मतदानाच्या दिवसाआधीच मतपत्रिका स्कॅन करण्याचीही परवानगी आहे. मात्र, कायद्यानुसार ठरवलेल्या वेळेपूर्वी निकाल जाहीर करता येत नाहीत. या सर्व कारणांमुळे मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी लागणारा वेळ कमी होतो.




हजारो केंद्रांवर एकाच वेळी मतमोजणी

अमेरिकेत संपूर्ण देशाची मतमोजणी एकाच ठिकाणी होत नाही. त्याऐवजी वेगवेगळ्या राज्यांतील काउंटी, शहरं आणि गावांमध्ये स्वतंत्रपणे मतमोजणी केली जाते. असोसिएटेड प्रेसच्या (AP) माहितीनुसार, देशभरात अशी १० हजारांहून अधिक स्थानिक निवडणूक क्षेत्रे आहेत, त्यामुळे हजारो पथकं एकाच वेळी आपापल्या केंद्रांवर मतपत्रिका स्कॅन करून मतांची मोजणी करतात. प्रत्येक फेरीत मोजलेली मते स्थानिक निकालांमध्ये जोडली जातात आणि ही आकडेवारी पुढे निकाल एकत्रित करणाऱ्या यंत्रणांकडे पाठवली जाते.

१८४८ पासून अमेरिकेच्या निवडणुकांचे निकाल प्रसिद्ध करणारी असोसिएटेड प्रेस ही वृत्तसंस्थाही या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. देशभरातील निवडणूक अधिकारी, पत्रकार, सरकारी संकेतस्थळे आणि इलेक्ट्रॉनिक अपडेट्सच्या माध्यमातून AP मतमोजणीची आकडेवारी गोळा करते. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अमेरिकेतील विविध निवडणूक कार्यालयांमधून मतांचे आकडे मिळवण्यासाठी तिचे चार हजारांहून अधिक पत्रकार कार्यरत असतात, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या मतमोजणीचे आकडे एकत्र करून निकालांचे कल लवकर समोर आणणे शक्य होते.

मतमोजणी पूर्ण होण्याआधीच विजेता कसा जाहीर होतो?

अमेरिकेत मतमोजणी सुरू असतानाच वृत्तसंस्था एखाद्या उमेदवाराला विजयी घोषित करू शकतात. यासाठी असोसिएटेड प्रेससह इतर माध्यमे आतापर्यंत मोजलेली मते, किती मतपत्रिकांची मोजणी बाकी आहे आणि कोणत्या भागांतील मतमोजणी सुरू आहे याचा अभ्यास करतात. उदाहरणार्थ, एखादा उमेदवार एक लाख मतांनी आघाडीवर असेल आणि केवळ २० हजार मतांची मोजणी बाकी असेल, तर उरलेली सर्व मते प्रतिस्पर्ध्याला मिळाली तरी तो आघाडीवरील उमेदवाराला टक्कर देऊ शकत नाही; अशा वेळी संपूर्ण मतमोजणीची वाट न पाहता वृत्तसंस्था विजेत्यांची नावे जाहीर करतात.

मात्र, वृत्तसंस्थांनी जाहीर केलेला हा निकाल अधिकृत नसतो. अमेरिकेच्या निवडणूक सहाय्य आयोगाच्या माहितीनुसार, निवडणुकीच्या रात्री जाहीर होणारे आकडे प्राथमिक स्वरूपाचे असतात. सर्व मतांची मोजणी पूर्ण करणे, आकडेवारीची पडताळणी करणे आणि निकालांना औपचारिक मान्यता देणे ही जबाबदारी निवडणूक अधिकाऱ्यांची असते. विशेषतः अटीतटीच्या लढतींमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही दिवस, तर कधी काही आठवडेही लागू शकतात.

थोडक्यात, अमेरिकेत मतदान कागदी मतपत्रिकांवर होत असले तरी त्यातील बहुतांश मतांची मोजणी यंत्रांद्वारे केली जाते. निवडणुकीच्या आधीच लाखो मतपत्रिकांची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि हजारो केंद्रांवर एकाच वेळी मतमोजणी सुरू असते, त्यामुळे सर्व मतांची मोजणी पूर्ण होण्याआधीच काही तासांत निकालांचे कल समोर येतात. मात्र, अधिकृत निकालासाठी काही दिवस किंवा आठवडे वाट पाहावी लागू शकते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.