मुंबईत दोन लाखांची बनावट स्कॉच जप्त
मुंबई : मुंबई येथील सायन आणि धारावी येथे छापा टाकून दोन लाख रुपयांची बनावट स्कॉच दारू जप्त करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी ही कारवाई केली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. सुरेश बाबू वाघेला (वय 28) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बेकायदा, बनावट दारू विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबई शहर येथील निरीक्षक आनंद पवार यांना खबऱयाद्वारे सायन येथे एक व्यक्ती बनावट स्कॉचची विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती मिळाली. निरीक्षक पवार यांनी पथकासह सापळा रचून वाघेला याला सायन येथे दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने धारावी येथे बनावट स्कॉचचा साठा केल्याची कबुली दिली. नंतर धारावी येथे छापा टाकून आणखी बनावट स्कॉचच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. सूर्यवंशी, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आनंद पवार, जे. एम. खिलारे, दुय्यम निरीक्षक अमोल पराडकर, श्रुती कानडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.