विवस्त्र धिंड आणि सामूहिक बलात्कार झालेली पीडिता कारगील हीरोची पत्नी
मणिपुरात ज्या दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला त्यातील एक पीडिता कारगील युद्धातील हीरोची पत्नी असल्याचे समोर आले आहे. या पीडितेची आणि तिच्या पतीची व्यथा ऐकून सगळेच हेलावले आहेत.
मणिपूर घटनेचे देशभरात संतप्त पडसाद उमटत असून अख्ख्या जगात यावरून छी-थू होत आहे. या सगळ्यावर गेंडय़ाच्या कातडीचे केंद्र सरकार मात्र मुके, बहिरे आणि आंधळे बनून कुंभकर्णासारखे पडून आहे. त्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी सरकारला घेरले, तर महाराष्ट्र विधानसभेतही गदारोळ झाला. दरम्यान, मणिपूरमध्ये जनक्षोभ उसळला असून संतप्त जमावाने धिंड प्रकरणातील मुख्य आरोपीचे घर पेटवून दिले.
मणिपूरच्या घटनेवर देशभरातून तीक्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. दुसरीकडे मणिपूर भाजपचे मुख्यमंत्री बीरेंद्र सिंह हे मात्र मी राजीनामा देणार नाही, असे सांगत आहेत. माझ्या राजीनाम्यापेक्षा आता मणिपूरची शांतता महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.
'बेटी बचाव'चे काय झाले?
पश्चिम बंगालच्या हिंसाचारावर प्रश्न विचारले जातात, पण आज मणिपूरसह संपूर्ण देश जळत आहे. लेकींना पेटवून दिलं जात आहे. त्यांची अब्रू लुटली जात आहे. दलित, अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरू आहेत. पंतप्रधान मोदींना याचे जराही दुःख होत नाहीय का? तुम्ही 'बेटी बचाव'चा नारा दिला होता त्याचे काय झाले, असा खरमरीत सवाल करतानाच देशातील याच महिला तुम्हाला राजकारणातून हद्दपार करतील, अशी जळजळीत टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केली.
आंतरराष्ट्रीय मिडियाकडून दखल; टीका
मणिपुरातील भयंकर घटनेची दखल जगातील प्रमुख मिडियाने घेतली असून, पंतप्रधान मोदींनी अखेर मौन सोडले अशा शब्दांत टीका केली आहे. अमेरिकेच्या ' द वॉशिंग्टन पोस्ट', 'द न्युयॉर्क टाइम्स', लंडनच्या 'द गार्डीयन', यांच्यासह 'अल जजिरा' आदी वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर ही ठळक बातमी आहे.
युद्धात देशासाठी लढलो, पण पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही! दुर्दैवी लष्करी जवानाची वेदना
युद्धात देशासाठी लढलो, पण माझ्या पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही. कारगिलच्या युद्धापेक्षाही हे युद्ध मला भयंकर वाटतेय, अशा शब्दांत पीडितेचा पती आणि कारगिल युद्धातील हीरोने आपली वेदना मांडली. माझं सर्वस्व उद्ध्वस्त झालं आहे, असा आक्रोश करत या निवृत्त जवानाने भीषण प्रसंग कथन केला. 4 मे रोजी हजारोंचा जमाव आमच्या गावात आला. या जमावाने गावातील घरे पेटवून देण्यास सुरुवात केली. अख्खे गाव भयभीत झाले होते. जिवाच्या आकांताने पळत होते. त्यात माझी पत्नीही होती. आमची ताटातूट झाली. जवळच्या जंगलात पत्नीने आसरा घेतला.
हल्लेखोर तीथपर्यंत पोहचले. त्यांनी माझ्या पत्नीसह अनेकांना पकडले. त्यांचा प्रतिकार करणाऱया वडिलांना आणि भावाला मारण्यात आले. पत्नीसोबत एक अन्य महिला, मूल आणि एका कुटुंबातील तीन सदस्य होते. पोलिसांना न जुमानता जमावाने अमानुष कृत्य केले. माझ्या पत्नीसह तीन महिलांना बंदुकीचा धाक दाखवून कपडे उतरवण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. त्या अवस्थेत त्यांना नाचायला लावले. मी काही अंतरावर होतो, पण काहीच करू शकत नव्हतो. हतबल होतो. दोन ते तीन तास या महिला जमावाच्या कब्जात होत्या. त्यांच्यावर भयंकर अत्याचार केले गेले. त्यानंतर रात्री उशिरा नागा गावात माझ्या पत्नीला सोडून देण्यात आले, असे सांगत या जवानाने आपला संताप व्यक्त केला. माझी पत्नी या सगळ्या प्रकाराने हादरली आहे. तणावाखाली गेली आहे. सध्या चुडाचांदपूर येथील रिलीफ कॅम्पमध्ये आमचे वास्तव्य आहे, असे या जवानाने सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
